छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. "या वेळेस आरक्षण घेऊनच उठू" असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, "29 ऑगस्टला सर्व मराठ्यांनी अंतरवालीत यावे. सरकारने आता आमच्या अस्मितेला हात घातला आहे. आरक्षण एक दिवस जरी लेट झाले तरी चालेल, पण 29 तारखेनंतर आम्ही सरकारची जिरवणारच. होऊ दे काय व्हायचे ते". त्यांनी पुढे सांगितले की, सरकार फक्त आश्वासनं देत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची एकमेव मागणी आहे.
गेल्या 2 वर्षांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे नोंदी शोधून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप झाले. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "24 ऑक्टोबर 2023 नंतर मराठवाड्यात 3 लाख 11 हजार 860 लोकांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र त्यापैकी फक्त 20 ते 25 हजार लोकांनीच जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी अर्ज केले आहेत".
तायवाडे म्हणाले, "सरकारने जर सरसकट जात वैधता प्रमाणपत्र दिले तर आम्ही रस्त्यावर उतरू. प्रमाणपत्र दिले म्हणजे झाले का? त्यासाठी अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करावी लागते ना". जरांगे यांच्या नव्या उपोषणाच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सरकार आता या आंदोलनाला कसे सामोरे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.