अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणाच्या चौथ्या दिवशी खालावली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे त्यांचा रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखर (Sugar) कमी झाल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले आहे. त्यांना तातडीने उपचारांची गरज असताना जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी आणि उपचार दोन्हीला नकार दिला आहे. रात्री दोन वेळा आरोग्य विभागाचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले होते. पहिल्यांदा पथकाला माघारी परतावे लागले, तर दुसऱ्यांदा रात्री 1.15 वाजता डॉक्टरांनी बराच वेळ प्रयत्न करूनही जरांगे यांनी तपासणी करू दिली नाही. याबाबत वैद्यकीय पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2026 पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 11 व्या वेळा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आपले शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत - 58 लाख कुणबी नोंदी असलेल्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या, जात पडताळणी समिती रद्द करून तहसीलदारांना अधिकार द्या, हैदराबाद, सातारा, औंध गॅझेट लागू करा, मराठा-कुणबीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा आणि आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा इतिहास मोठा आहे. पहिले उपोषण 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटीत 17 दिवस चालले होते. त्यानंतर दुसरे उपोषण 25 ऑक्टोबर 2023, तिसरे 20 जानेवारी 2024 रोजी महिलांच्या हस्ते सोडवले, चौथे 8 जून 2024, पाचवे 20 जुलै 2024 रोजी प्रकृती खालावल्याने सहकाऱ्यांनी सलाईन लावले होते. याशिवाय मुंबईत आझाद मैदानावरही दोन वेळा उपोषण आणि 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात आला होता. आतापर्यंत त्यांनी एकूण 10 उपोषणे केली असून हे 11 वे उपोषण आहे.
या आंदोलनानंतर सरकारने अनेक पावले उचलली होती. कुणबी प्रमाणपत्रासाठी शिंदे समिती स्थापन केली, हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी घेण्याचा जीआर काढला. सरकारच्या माहितीनुसार 14 लाख 31 हजार अर्जांपैकी 14 लाख 24 हजार जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 34 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
दरम्यान, या उपोषणावर जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आढावा घेतला. मागण्यांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांनी शिष्टाई केली होती, मात्र ती निष्फळ ठरली. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत जाऊन वर्षा बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला असून सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.