Maithili Thakur : 4 कोटीची संपत्ती, 13 कोटीची Rolls Royce, सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर वादात, आयकर चौकशीची मागणी - टॉप न्यूज मराठी

बिहार : बिहारच्या सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांच्या महागड्या कारमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत लालबागचा राजाच्या दर्शनाला त्या रोल्स-रॉइस कारमधून आल्या होत्या आणि तेव्हापासून त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. एका सीएने त्यांच्या संपत्ती आणि कारच्या किमतीवर प्रश्न उपस्थित करत थेट आयकर विभागाला टॅग करून चौकशीची मागणी केली आहे.

मैथिली ठाकूर कोण आहेत 

मूळच्या बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध लोकगायिका आहेत. मैथिली, भोजपुरी आणि हिंदी लोकगीतांमुळे त्या लहान वयातच देशभरात प्रसिद्ध झाल्या. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अलीनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. गायिका ते आमदार हा त्यांचा प्रवास खूप चर्चेत राहिला आहे. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

नेमकं काय घडलं 

सीए रुचिता वघानी यांनी एक्सवर पोस्ट लिहून म्हटले आहे की निवडणुकीच्या वेळी मैथिली ठाकूर यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 82 लाख 33 हजार 255 रुपये होती. यात 1 लाख 80 हजार रोख, 72 लाख बँक खात्यात, 31 लाख म्युच्युअल फंडात, 20 हजाराची स्कूटी, 52 लाखाचे 409 ग्रॅम सोने आणि दिल्लीत दीड कोटीचा फ्लॅट याचा समावेश होता. मग 4 कोटीपेक्षा कमी नेटवर्थ असलेल्या व्यक्तीकडे 13 कोटीची रोल्स-रॉइस कशी काय असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका यूजरने तर असा दावा केला की रोल्स-रॉइस कंपनी 100 कोटी नेटवर्थ नसलेल्या व्यक्तीला गाडी विकतच नाही. या पोस्टनंतर हा विषय चांगलाच तापला असून अनेकांनी आयकर विभागाने याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मात्र या कारबाबत मैथिली ठाकूर यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.