मुंबई : राज्याच्या मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच "आता रिटायर व्हावसं वाटतंय" असे विधान केले. या एका वाक्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात असून विरोधकांनी याचा मुद्दा लावून धरला आहे. विशेषतः काँग्रेसने या निमित्ताने त्यांना थेट पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्री बनण्याची ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंना उघड निमंत्रण दिले. ते म्हणाले की मुंडे साहेबांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचे काम सुरू झाले. पंकजा ताईंना भाजपमध्ये योग्य तो सन्मान मिळत नसेल तर त्यांच्या मनात खदखद असणे साहजिक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी भाजपचा त्याग करून स्वतंत्रपणे नेतृत्व करावे. महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री देण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रवासात आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू. जर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या ऑफरवर पंकजा मुंडे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान वडेट्टीवार यांनी आजपासून सुरू होणाऱ्या विदर्भातील मंडल यात्रेची माहितीही दिली. ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये फिरून ओबीसींच्या प्रमुख मागण्यांसाठी जनजागृती करणार आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना त्वरित करावी, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा या प्रमुख मागण्या यात्रेद्वारे मांडल्या जाणार आहेत. तसेच महाज्योतीसाठी 1000 कोटींची तरतूद आणि ओबीसींच्या 1 लाख पदांचा बॅकलॉग भरावा अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने मोजल्या जात असल्याच्या मुद्द्यावरूनही वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. समृद्धी महामार्गाच्या कामाचा दर्जा घसरल्याने लोक आता त्या रस्त्यावरून गाडी चालवायलाही घाबरतात. मोठ्या कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यासाठी कोट्यवधींची कामे दिली जात आहेत. गडचिरोली आणि भंडाऱ्यात जमिनीचे बाजारभाव लाखात असताना कमी दरात मोजणी करून पोलीस बंदोबस्तात बळजबरी केली जात आहे. हे सगळे सरकार टक्केवारीसाठी करत आहे की उद्योजकांना खुश करण्यासाठी असा सवाल त्यांनी केला.
शेवटी नाशिकमध्ये लागलेल्या "छगन भुजबळांना पालकमंत्री करा" या बॅनरवर बोलताना त्यांनी सांगितले की कुंभमेळ्याच्या कामात बाहेरच्या राज्यातील कंत्राटदारांना संधी दिल्याने 30 टक्के कमिशनखोरी झाली. पहिल्याच पावसात कामे वाहून गेली. त्यामुळे जनतेत संताप आहे आणि म्हणूनच असे बॅनर लागले आहेत असा टोला त्यांनी लगावला.