Maharashtra Politics : 5 कोटींची लाच मागितली, संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ, शिरसाठ यांच्या पलटवाराने नवीन वाद उफाळणार? काय म्हणाले शिरसाठ? वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

लातूर: लातूरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद सुरू झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या कामासाठी 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपानंतर शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे हा वाद आणखी पेटला आहे.

संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला: लातूरमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. उदगीरकर नावाच्या व्यक्तीने हा प्रस्ताव दिला होता. काम न झाल्याने हा प्रकार समोर आला, असे राऊत म्हणाले. बरं झालं उद्धव ठाकरे यांनी यांना मंत्री केलं नाही, अशी टिप्पणीही राऊत यांनी केली होती.

संजय शिरसाट यावर काय म्हणाले: मला मंत्री म्हणून 10 कोटींच्यावरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकारच नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. गेल्या दोन वर्षात मी 25 कोटीचा एक तरी प्रस्ताव मंजूर केल्याचं दाखवा, असे आव्हान शिरसाट यांनी दिले. अण्णा भाऊ साठे यांच्याशी या प्रकरणाचा संबंध काय, लेटरहेडवर महापुरुषांचे नाव लावायचे आणि काम नाही झाले की बदनाम करायचे, असा प्रकार सुरू आहे, असे ते म्हणाले. वाटेगावात अण्णा भाऊ साठे यांचे 50 कोटींचे मोठे स्मारक करतोय, महाडला चवदार तळ्यासाठी 90 कोटी खर्च करतोय. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कधी अण्णा भाऊ साठेंच्या फोटोला हार घातला का, असा सवालही त्यांनी केला. मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता, तिथून टेम्पो आत कशासाठी यायचे, हे सांगायला लावू नका. तुमच्या मंत्रिमंडळात कोणता दलित मंत्री होता, याचे नाव सांगा, असा पलटवारही शिरसाट यांनी केला.