मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये Maharashtra Politics आता फोडाफोडीच्या राजकारणाला नाविन्य राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष आणि पक्षातील नेते मंडळी फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सध्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde शिवसेनेकडे मार्गस्थ होत असल्याचं दिसून आले. तर आज विधानभवनात उद्धव ठाकरेंचे चार नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanavis यांच्या भेटीला गेले असल्याच समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनामध्ये आज पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू आणि आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल विधान भवनामध्ये सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली होती. त्यामुळे आज मुंबईतील विविध विकास प्रकल्प यांबाबत चर्चा करण्यासाठी हे चार नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले असल्याचे समजते आहे.
उद्धव ठाकरे यांचे आणखीनही काही नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाणार असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंच्या या चार महत्त्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट देखील चर्चेचा विषय ठरते आहे.