Maharashtra Politics : सोलापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा झटका ! वैराग नगरपंचायतीचे उपाध्यक्षांसह 15 सदस्य शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल - टॉप न्यूज मराठी

सोलापूर : राज्याच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. वैराग नगरपंचायतीचे उपाध्यक्ष निरंजन भूमकर यांनी थेट 15 नगरसेवकांसह राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. एकाचवेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष आणि तब्बल 15 नगरसेवकांनी गट बदलल्याने वैरागमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. निरंजन भूमकर हे बार्शी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांच्यासह एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींचे जाणे हे अजित पवार गटासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा सेटबॅक मानला जात आहे.

महायुतीतच अंतर्गत ओढाताण?

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. विरोधी बाकांवरून नेते येत असतानाच आता महायुतीतील घटक पक्षांमधूनही प्रवेश होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत "ऑपरेशन टायगर" अंतर्गत शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले होते. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे सध्या महायुतीतील सर्वाधिक खासदार शिंदे गटाकडेच आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने महायुतीतील अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घडामोडीमुळे बार्शी आणि वैराग परिसरातील राजकारणाला नवे वळण मिळणार आहे. नगरपंचायतीवरील सत्तासमीकरणेही बदलू शकतात. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र पक्षातील नाराजी आणि पुढील हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.