Maharashtra Politics : भीती होती तेच घडले! ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळंब मधील 10 नगरसेवक मातोश्री वरील महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर, उद्धव ठाकरे म्हणाले... - टॉप न्यूज मराठी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळंब नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण दहा नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. गटनेत्यासह संपूर्ण गटच फुटल्याने आमदार कैलास पाटील आणि उद्धव ठाकरे गटाला हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. आज सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

काल मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर कळंबमधील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. त्यामुळे अस्वस्थता वाढली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक होती. मात्र कळंबचे एकही नगरसेवक या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्याचवेळी काहीतरी मोठे घडणार याची कुणकुण लागली होती. 

कळंब नगरपरिषदेतील हे 10 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. सुप्रीम कोर्टाच्या 2023 मधील निकालानुसार 2/3 पेक्षा जास्त नगरसेवक एकत्र दुसऱ्या पक्षात गेले तर अपात्रता लागत नाही. कळंबच्या 17 पैकी 10 नगरसेवक एकत्र जात असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच "ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग होईल आणि कैलास पाटील त्याचा भाग असतील" असा दावा केला होता. कळंबच्या या फुटीनंतर तो दावा खरा ठरल्याची चर्चा आहे.

या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवडणूक लढवली त्यांनीच पाठ दाखवली. हा मतदारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात आहे. जनतेने मशालीसाठी मत दिले होते कमळासाठी नाही". सत्तेच्या जीवावर लोकप्रतिनिधी फोडणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. "हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन लोकशाहीविरोधी आहे" असेही ते म्हणाले. एखादा नगरसेवक गेला म्हणून शिवसेना संपत नाही. बाळासाहेबांनी शिकवले आहे वादळात दिवा विझतो पण मशाल पेटत राहते. कळंबमध्ये आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू आणि जनतेच्या जीवावर जिंकू". कार्यकर्त्यांना त्यांनी खचून न जाण्याचा सल्ला दिला आणि आमदार कैलास पाटील यांना कळंबमध्ये नव्याने संघटना बांधणीचे आदेश दिले.

2017 पासून कळंबवर ठाकरे गटाची पकड होती. आता एकाच झटक्यात तो बालेकिल्ला हातातून गेल्याने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी धाराशिवमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.