MAHARASHTRA POLITICS : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पवार गटाच्या भूमिकेवर थेट हल्लाबोल करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पवार गटाला त्यांचा जुना इतिहास आठवून दिला. त्यांच्या मते, ज्या नेतृत्वाने पवार यांचा पक्ष आणि कुटुंब फोडले, त्यांच्याच बाजूने उभे राहणे हे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखे आहे. सत्तेसाठी भाजपसोबत जाणे म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह करण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली.
ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तुमचा पक्ष फोडला. तुमचं कुटुंब फोडलं,. त्यांच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखं आहे. तुम्ही सत्तेसाठी भाजपसोबत जाणार असाल तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही. तुम्ही भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्रद्रोह केला आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी तुम्ही अनिल देशमुखांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि शाहांमुळे ते तुरंगात गेले. नवाब मलिकांची तुम्ही माफी मागितली पाहिजे. तेव्हा मलिक महत्त्वाचे नेते होते. हे दोन्ही नेते अमित शाह आणि मोदींच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यांच्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावं लागलं. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत जात आहात. हा महाराष्ट्रद्रोह आहे, असं संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.
शरद पवार गटाने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल आणि तसं जाहीर केलं असेल तर त्यांच्या पक्षाच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हा दुर्देवी निर्णय असेल. अशा कोणत्याही पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये. तुमचे आठ खासदार निवडून आले. ते महाविकास आघाडी म्हणून आले. भाजपमुळे आले नाही. 8 पैकी 5 ठिकाणी तुम्ही भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. अशावेळी एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजूने उभे राहत असाल तर राज्यातील जनता सहन करेल असं वाटत नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव आणखी वाढला आहे. पवार गट या टीकेला काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.