राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण ठाम आहोत आणि मोर्चा होणारच, असा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला पक्षाचा पाठिंबा नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेला रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. पक्षाचा पाठिंबा मिळणारच, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हा शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. यात राजकारण येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात फिरून शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही महाराष्ट्रात दौरा केला आहे. स्वतः शरद पवार साहेबांनीही सगळा आढावा घेतला आहे. या सर्वांनी आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिले आहे, तेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत.
विदर्भातील अधिवेशनाचे महत्त्व सांगताना रोहित पवार म्हणाले, विदर्भात हे जे अधिवेशन होत आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. कारण पुढच्या तीन वर्षांमध्ये परत विदर्भात अधिवेशन होणार नाही. तेथील विधानभवन हे दुरुस्तीसाठी काढण्यात आले आहे. आज सर्वच ठिकाणी दुष्काळ आहे, पण विदर्भाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे आंदोलन महत्त्वाचे आहे आणि ते होणारच.
या आंदोलनात पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, या आंदोलनात शशिकांत शिंदे यांच्यापासून सगळे मोठे नेते शेतकऱ्यांना, शेतमजुरांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी सहभागी होतील.
विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आपला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, पवार साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितले आहे की, जिथे कुठे महाराष्ट्रातील एखादा माणूस अडचणीत येतो, तिथे भूमिका न पाहता त्या व्यक्तीच्या मागे उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी आंदोलने केली. काही ठिकाणी आम्ही पक्षाचे चिन्ह वापरले, काही ठिकाणी नाही वापरले. मात्र नेहमीच सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका राहिली आहे. त्यामुळे या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा मिळणारच.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे सत्ताधारी पक्षांना बाहेरून पाठिंबा देतील किंवा पक्ष विलीन होईल, अशा चर्चा सुरू आहेत. पण रोहित पवार हे सुरुवातीपासूनच विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. त्यांनी अनेक वेळा आम्ही शरद पवारांसोबतच राहणार, भाजप सोबत जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आले आहे.
रोहित पवार यांचा हा मोर्चा सरकारवर दबाव आणण्यासाठी आहे का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आहे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत, हाच आमचा उद्देश आहे.