राजकारण : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रबिंदू पुन्हा एकदा शरद पवार हेच आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा विषय थंडावला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. आता त्यात मुख्यमंत्रीपदाचा नवा मुद्दा जोडला गेला आहे.
दिल्लीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, शरद पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ते सहजासहजी विलिनीकरणाला होकार देणार नाहीत. त्याबदल्यात त्यांनी मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद मागितल्यास आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिले होते, तोच कित्ता पवारही गिरवू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. सध्या लोकसभेत एनडीएकडे 320 खासदार आहेत, 360 ची गरज आहे. पवार गटाकडे लोकसभेत 8 आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. त्यामुळे भाजपला पवारांची गरज असल्याचे बोलले जात आहे.