अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांबद्दल खूप भावना व्यक्त केल्या. मग त्यांच्या विमान अपघाताची एफआयआर का दाखल झाली नाही, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊत म्हणाले, छोट्या छोट्या गोष्टींवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारे गृहमंत्री या प्रकरणात गप्प का आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे, यासाठी एफआयआर होणे गरजेचे होते. पण ती झाली नाही. यामुळेच अनेक शंका निर्माण होत आहेत.
शाह आणि फडणवीस तपासाची फाईल दाबत असल्याचा आरोपही राऊतांनी केला. अजित पवार जिवंत असताना त्यांच्यामागे ईडी लावली गेली का, असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे का दिला जात नाही, असेही ते म्हणाले.
रोहित पवार यांनी मफलर मॅनचा विषय समोर आणल्याबद्दल राऊतांनी त्यांचे कौतुक केले. ज्या कंपनीचे विमान अपघातात वापरले गेले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री मफलर घालून हसताना दिसले होते, असा उल्लेख त्यांनी केला. एफआयआर झाली असती तर फडणवीसांवर संशय घेण्याचे कारणच नव्हते. एफआयआर न झाल्याने काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय येतो, असे राऊत म्हणाले.