मुंबई - शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना प्रफुल पटेल यांनी भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. व्हिडिओत शरद पवार हे 10 तारखेला भेटूयात असे पटेल यांना सांगताना दिसत होते. त्यामुळे विलिनीकरणावर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता.
यावर सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत भाष्य केले. एखादी व्यक्ती रुग्णालयात भेटायला गेली तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. आपण इतके असंस्कृत झालो का, असेही त्या म्हणाल्या.
पॉलिसी मेकिंगमध्ये पक्षाचा विचार नसतो, असे सुळे यांनी सांगितले. विरोधी पक्षात टोकाची भूमिका घेतो, पण देशाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र असतात, असे त्या म्हणाल्या. पहलगाम हल्ल्यानंतर शरद पवार यांनी देशासोबत असल्याची भूमिका घेतली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली. वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.