Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या सत्तेबाबत मोठा दावा केला आहे. भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांच्या मते, जेन-झी आंदोलनापासून भाजपच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रवास सुरू झाला आहे. तरुण पिढी आता प्रश्न विचारायला लागली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना यापुढे सोपे जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप सत्तेतून जाणार असल्याची चाहूल लागल्याने भाजपचे नेतृत्व आणि त्यांचे समर्थक सध्या बिथरले आहेत, असे निरीक्षणही राज ठाकरे यांनी नोंदवले. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजप लवकरच सत्तेतून पायउतार होणार हे प्रत्यक्षात दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या काळात होणाऱ्या निवडणुका आणि राज्यातील राजकीय वातावरण पाहता राज ठाकरे यांच्या या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून काय उत्तर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.