Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? छगन भुजबळांनी दिले मोठे संकेत, नेमकं काय म्हणाले वाचा, सविस्तर - टॉप न्यूज मराठी

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालक सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठे भाष्य केले आहे. विलिनीकरणाच्या चर्चा आम्हीही फक्त टीव्हीवर ऐकत आहोत. आमच्यापर्यंत अजून कोणीही काही सांगितलेले नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, आमच्या पक्षातील सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ. त्यांना नेमके काय हवे आहे हे अजून कळलेले नाही. सगळे एनडीएमध्ये जाणार आहेत की इंडिया आघाडीत जाणार आहेत याचा अजून शोध लागलेला नाही. सुनेत्रा ताईंनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आल्यावर सर्वांना कळेल. त्या आधी त्या आम्हा सर्वांना विश्वासात घेतील याची मला खात्री आहे.

विलिनीकरण करायचेच असेल तर ते सांघिकरित्या झाले पाहिजे. एक एक खेळाडू जाऊन परत येणे योग्य नाही. क्रिकेटची मॅच सुरू आहे, एकमेकांच्या गळ्यात हात घालून एकत्र ठरवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शरद पवार यांना भेटण्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, मीही पवार साहेबांना हॉस्पिटलमध्ये आणि घरी जाऊन भेटलो. तब्येतीची विचारपूस करणे यात काही चूक नाही. माझ्या आयुष्यात दोनच नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. दोन्ही पवार एकत्र आले तर जुन्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल, असेही ते म्हणाले.