राजकारण : राज्यात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या चर्चेला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे अधिक बळ मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वीच निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल, असे म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा तशीच भावना व्यक्त केली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणी नसेल, असे निंबाळकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत असे काही होईल असे वाटत नाही, असे ते म्हणाले. मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सकाळचा माणूस संध्याकाळी कुठे आणि संध्याकाळचा माणूस सकाळी कुठे असतो हे सांगता येत नाही, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत गुलाबरावांना विचारणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.
दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत हालचाल दिसत नाही. मात्र नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे.