MAHARASHTRA POLITICS : मुंबईत आज पुन्हा राजकीय तापमान वाढणार, दादरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे एकाचवेळी आंदोलन - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. काल दादर शिवाजी पार्क येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

रविवारी दिल्लीतील घडामोडींच्या निषेधार्थ शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गदारोळ झाला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवली होती. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

आज दादर परिसरात दोन वेगवेगळी आंदोलने होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. तर ठाकरे गटाकडून दडपशाहीच्या विरोधात तिरंगा हातात घेऊन मूक आंदोलन केले जाणार आहे.

गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत SIR प्रक्रियेवरून वाद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या बदलांमुळे कोट्यवधी मतदार बाद झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरूनच आता मुंबईतही राजकारण तापले आहे. राज ठाकरे आजच्या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार असल्याचे बोलले जात आहे.