अंतरवाली सराटी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावर आज दहा सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की ताईने बोलावले तर भाऊबीजेला नक्की जेवायला जाईन, पण आंदोलन सुरु असताना असे बोलावू नये.
अमृता फडणवीस यांना एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. मी त्यांना माझ्या घरी जेवायला येण्याचे निमंत्रण देते. त्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे सांगितले जात असताना अमृता फडणवीस यांचे हे विधान आले होते.
या निमंत्रणावर आज मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, ताईने सांगितलंय ना, मग जेवायला पण जाऊ, पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ. यासोबतच त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळा बाबत पण भाष्य केले. मार्गदर्शक सांगतील तसं सरकारचं शिष्टमंडळ वागतं, शिष्टमंडळ येण्याची मी वाट बघत नाही. मी मुंबईला जाणार हे निश्चित आहे. बारा तारखेला एकत्र आलो की तारीखच जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस असून त्यांच्या प्रकृती बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने अशी भूमिका घेतली आहे की मनोज जरांगे यांचे समाधान होणार नसेल तर अंतरवाली सराटीला जाणार नाही. तरीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे कशी राबवली जातात हे बघू, असे जरांगे म्हणाले. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने आज जरांगे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.