Maharashtra Politics : शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार ॲक्शन मोडवर, सलग दुसऱ्या दिवशी कोअर कमिटीची बैठक ! बंद दाराआड काय चर्चा - टॉप न्यूज मराठी

Mumbai : दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. प्रफुल्ल पटेल यांच्यासह झालेल्या या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. ही भेट कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा ?

सूत्रांच्या माहितीनुसार या भेटीत तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.

1.विद्या प्रतिष्ठानसारख्या पवार कुटुंबाच्या शैक्षणिक संस्थांच्या पुढील वाटचालीवर,

2 बारामतीसह राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी, 

3 दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील विलीनीकरणाच्या शक्यतेवर. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात आलेला दुरावा कमी करण्याच्या दृष्टीनेही ही भेट महत्त्वाची होती.

भेटीनंतर पार्थ पवारांनी लावला बैठकांचा धडाका

शरद पवारांना भेटल्यानंतर पार्थ पवार अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पक्षांतर्गत बैठकांचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी वरळी येथील शुभदा निवासस्थानी मोजक्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक उपस्थित होते. राज्यातील विकासकामे आणि मंत्र्यांच्या खात्यातील अडचणींवर चर्चा झाली. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा कोअर कमिटीची बैठक सुरू आहे, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नवाब मलिक हेदेखील उपस्थित आहेत. सलग दोन दिवस बैठकांमुळे राष्ट्रवादीत नक्की काय शिजतंय याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार काय म्हणाले ?

या भेटीवर शरद पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "विलीनीकरणाचा असा कोणताही प्रस्ताव सध्या माझ्यासमोर नाही." 

राजकीय प्रतिक्रिया काय ?

दुसरीकडे भाजपकडून या घडामोडींकडे लक्ष ठेवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटले होते की, जर विलीनीकरणाची चर्चा सुरू असती तर अजितदादांनी मला सांगितले असते. तर राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पार्थ पवार हे स्वतःसाठी राज्यसभेच्या जागेसाठी किंवा पक्षात मोठ्या भूमिकेसाठी फिल्डिंग लावत आहेत.