MAHARASHTRA POLITICS : दिल्लीत महत्त्वाची राजकीय घडामोड ! मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, चर्चांना उधाण - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत राज्यातील प्रलंबित विकास प्रकल्प, केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी आणि निधी संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. राज्याच्या प्रगतीचा आढावा आपण पंतप्रधानांना दिला, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीसांच्या या भेटीपूर्वी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींची भेट घेतली होती. शिवाय 13 ऑगस्टच्या रात्री उशिरा शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेऊन जवळपास 20 मिनिटे चर्चा केली होती. त्या चर्चेत कोणते विषय होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही खासदारही अलीकडेच मोदींच्या भेटीला गेल्याने ते एनडीएमध्ये सामील होणार का, अशी चर्चा रंगली होती. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये मोदी आणि शरद पवार एकत्र दिसल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

यासोबतच केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील जोरात आहे. शिवसेना शिंदे गटातून आलेल्या 6 खासदारांपैकी 2 जणांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सलग भेटीगाठींमुळे महाराष्ट्रातील महायुतीतील समीकरणे आणि केंद्रातील राजकारणात काही नवा बदल होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.