मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी संपल्यानंतर कोर्टाबाहेरच ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
कोर्टाबाहेर माध्यमांसमोर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के समोरासमोर आले. त्यावेळी राऊतांनी कॅमेऱ्यासमोर म्हस्केंकडे बोट दाखवत "घेऊन ये त्याला" असे म्हटले. त्यावर "अरे ये ना, यावच लागणार आहे ना" असेही ते म्हणाले. या व्हिडिओने सोशल मीडियावर लगेचच धुमाकूळ घातला. या प्रकारानंतर आज नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर थेट आणि गंभीर आरोपांचा भडिमार केला.
1. राऊतांना फेकूचंद म्हणत पलटवार
म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे फेकूचंद आहेत. मी त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देत असतो. त्यांच्याबद्दल मी भोंगा सारखे शब्द वापरले आहेत, त्यामुळेच त्यांचा माझ्यावर राग आहे.
2. राज्यसभा तिकिटावरून शिव्या दिल्याचा आरोप
"अख्ख्या शिवसेनेला माहित आहे, ज्यावेळी राऊतांना राज्यसभेचे तिकीट उशिरा जाहीर झाले होते, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडा, रश्मी वहिनींना सुद्धा शिव्या दिल्या होत्या. तिकीट जाहीर करायला उशीर झाला म्हणून ते असे वागत आहेत", असा दावा म्हस्केंनी केला.
3. मुख्यमंत्रीपदासाठी राऊतांनीच विरोध केला होता ?
"उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. पण स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिले नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, म्हणून शिवसेनेच्या आमदारांची बैठक पवईच्या हॉटेलमध्ये कोणी लावली? मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव घ्या असे कोण सांगत होते? हे सर्व शिवसेनेला माहित आहे", असा मोठा गौप्यस्फोट म्हस्केंनी केला.
4. विधान परिषदेच्या तिकिटाचा खुलासा
"एकनाथ शिंदे साहेबांनी बंडाचे पाऊल उचलले तेव्हा उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. मी स्पष्ट सांगितले मी शिंदे साहेबांसोबत आहे. अयोध्या दौऱ्यावेळी राऊतांनीच मला सांगितले होते की नरेश तुझे नाव विधान परिषदेसाठी आहे. पण नंतर त्यांनी अमशा पडवीला तिकीट दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की नरेशला तिकीट दिले तर तो शिंदेंसोबत जाईल, असे राऊतांनीच मला सांगितले होते", असे म्हस्के म्हणाले.
5. राजीनाम्याचे आव्हान
शेवटी म्हस्के यांनी राऊतांना थेट आव्हान दिले. "तुमच्याकडे नरेश म्हस्केंचे एक जरी पत्र असेल तर दाखवा. नसल्यास एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी देतो. शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही मला सतत फोन करत होता, ते काय बोलला होता ते जाहीर करा. कितीही टीका करा, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे आणि राहणार", असे ते म्हणाले.
कोर्टातील सुनावणीपेक्षा कोर्टाबाहेरचा हा वाद आता जास्त गाजत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदे गटावरील टीका वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आता या प्रकरणावर संजय राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.