मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मुंडे घराण्याच्या विधानांनी मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Mundhe यांनी "राजकारणातून निवृत्ती" चं वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Mundhe यांनीही असंच सूचक विधान केलं आहे. त्यामुळे बीडसह Beed Politics संपूर्ण राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
एका सामाजिक कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. "सध्या तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. आज सगळीकडे जातीपातीचं, धर्माचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं," असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र त्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. "पण नंतर लक्षात येतं की आपल्याला पुन्हा समता प्रस्थापित करायची आहे. महापुरुषांनी दिलेले विचार आमच्या पाठीशी आहेत," असं म्हणत ते समाजकार्यासाठी राजकारणात राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
यापूर्वी परळीतील एका सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोलताना त्या भावुक झाल्या. "मी रस्त्यावर खडकत आले. तेव्हा मला कंटाळा आलाय, आता मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, असं मी पीएला सांगितलं," असं त्या म्हणाल्या. परंतु पुढे नागरिकांचा उत्साह पाहून त्यांनी सूर बदलला. "आता मला नव्याने प्रेरणा मिळाली. मला लोकांचा विकास करायचा आहे," असं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना खुली ऑफर दिली. "भाजपमधून बाहेर पडा. बिनधास्त नेतृत्व करा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. आम्ही तुम्हाला साथ देऊ," असं वडेट्टीवार म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीडच्या राजकारणाचा चेहरा असलेल्या दोन्ही भावंडांनी एकाच वेळी "निवृत्ती" बद्दल भाष्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे दोन्ही नेते नाराजी व्यक्त करत असले तरी कार्यकर्त्यांना आणि विरोधकांना संदेश देण्यासाठी हे वक्तव्य असू शकते. सध्याचे जातीय आणि धर्मावर आधारित राजकारण, तसेच पक्षांतर्गत घडामोडींमुळे हे दोन्ही नेते अस्वस्थ आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या तरी दोघांनीही राजकारण सोडण्याचा थेट निर्णय जाहीर केलेला नाही. उलट समाजासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे घराण्याची ही भूमिका बीडच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.