Maharashtra Politics : शरद पवार गट लवकरच एनडीएत ? खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. या चर्चेसाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा, शिंदे गट आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे या भेटी-गाठी केवळ औपचारिक नसून त्यामागे काहीतरी मोठे राजकीय समीकरण जुळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी चर्चेचे नेमके मुद्दे कोणते होते याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुप्रिया सुळे किंवा अमित शाह यांच्याकडूनही या भेटीबाबत कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटीचा उद्देश काय होता याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान या घडामोडी घडत असतानाच दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना एक महत्त्वाचा संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार "शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार आहे, त्यासाठी तयार राहा" अशा आशयाची ही सूचना आहे. त्यामुळे पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना मानसिकरित्या सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. जर ही माहिती खरी ठरली तर लवकरच शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होऊ शकते आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

या सगळ्यात आणखी एक बाब लक्ष वेधून घेते ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांची भेट घेण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी देखील शाहांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांत दोन्ही पवार गटातील नेत्यांसह भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेते दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या सर्व भेटी-गाठी केवळ योगायोग आहेत की यामागे मोठे राजकीय गणित आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटींमुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या या सर्व घडामोडींवर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा भाजपा केंद्रीय नेतृत्वाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत ही केवळ चर्चा आहे असेही मानले जात आहे. मात्र दिल्लीतील या हालचाली आणि नेत्यांच्या भेटींमुळे येणाऱ्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे नेमके काय घडते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.