महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या सत्य घटनांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटाची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याने अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश या चित्रपटाच्या माध्यमातून केला जात आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना आणि नेत्या दीपाली सय्यद यांनी आजवर आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता त्या पुन्हा एकदा एका अत्यंत आव्हानात्मक आणि संवेदनशील भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाल्या आहेत. या चित्रपटात दिपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा 'रुपाली चाकणकर' यांची भूमिका साकारली आहे. या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि टीझरमध्ये भोंदूबाबा 'अशोक खरात'ची भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे, याचे नाव निर्मात्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. टीझरमध्ये या अभिनेत्याला केवळ पाठमोरे दाखवण्यात आले असून, त्याच्या चेहऱ्यावर सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
हा चित्रपट नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात याने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि त्या प्रकरणातील राजकीय लागेबांधे यावर आधारित आहे. हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘फ्लेमिंगो क्रिएशन’ आणि ‘मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड’ प्रस्तुत या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण धुरा निर्माते देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे अत्यंत जबाबदारीने सांभाळत आहेत. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान प्रख्यात दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत वेगात सुरू आहे. “आता सगळं उघड होणार…!” अशी लक्षवेधी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सादर करण्यात आला आहे. या ‘फर्स्ट लूक’मधील दीपाली सय्यद यांचा करारी अवतार पाहताक्षणीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. यावरूनच चित्रपटात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आणि त्यांच्या अभिनयाचा कस लावणारी असेल, याची प्रचिती येते. या पहिल्या दृश्यामध्ये त्यांच्यासोबत ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते उदय टिकेकर यांचीही प्रभावी उपस्थिती दिसून येत आहे. दीपाली सय्यद या आपल्या सहज अभिनयशैलीने या अत्यंत गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देऊ शकतील, असा पूर्ण विश्वास असल्यामुळेच त्यांची या भूमिकेसाठी निवड केल्याचे दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी सांगितले.
हा चित्रपट केवळ एक राजकीय नाट्य नसून, तो महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या एका अतिशय संवेदनशील आणि गंभीर प्रकरणावर पडदा उचलणार आहे. वास्तवाचे चटके देणाऱ्या या कथानकामुळेच घोषणेपासूनच या चित्रपटाविषयी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या भव्य कलाकृतीची मूळ कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, चित्रपटाची प्रभावी पटकथा आणि धारदार संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची (सिनेमॅटोग्राफी) धुरा डिओपी आकाश काकडे सांभाळत असून, कला दिग्दर्शन (आर्ट डिरेक्शन) अक्षय आंबेकर करत आहेत. कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी आकांक्षा गांधी यांनी चोख बजावली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रोडक्शन हेड म्हणून सचिन घनवट आणि प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून नेहा घोडके या तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.
या चित्रपटात काम केल्यामुळे आणि रुपाली चाकणकरांची भूमिका साकारण्याबाबत आपल्याला काही महिला नेत्यांकडून धमक्यांचे फोन आल्याचा खुलासा दिपाली सय्यद यांनी केला आहे. मात्र, कोणत्याही दबावाला न जुमानता आपण हा चित्रपट पूर्ण करणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.