Maharashtra : आज राज्यभरात रिक्षा बंद, बाईक टॅक्सी विरोधात चालक आक्रमक, प्रवाशांचे हाल - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभरात रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. सकाळपासूनच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांत रिक्षा रस्त्यावर उतरल्या नाहीत. त्यामुळे शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या बंदला जास्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजल्यापासून मुकाई चौक परिसरात रिक्षाचालकांनी एकत्र येत बाईक टॅक्सी तसेच ओला-उबरच्या रिक्षा अडवण्यास सुरुवात केली. बाईक टॅक्सीमुळे आमचा रोजगार धोक्यात आला आहे, आमचे कुटुंब रस्त्यावर येईल, अशी भीती चालकांनी व्यक्त केली.

मुंबईत मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागात रिक्षा सुरू होत्या, तर काही भागात रिक्षा कमी दिसल्या. ठाण्यातही बहुतांश रिक्षा सुरू असल्याचे चित्र होते.

रिक्षा संघटनांनी सरकारने बाईक टॅक्सी धोरण तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.