Lohgad Murder Case Latest Update: ‘लग्न नको होतं तर नकार द्यायचा होता, माझ्या मुलाचा जीव का घेतला?’ केतन अग्रवालच्या पालकांचा आक्रोश - टॉप न्यूज मराठी

लोहगड हत्याकांडाने कुटुंब हादरलं; होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने कट रचल्याचा आरोप, प्रकरणाची फास्ट-ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्याची मागणी.

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी मिळून कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर केतनच्या आई-वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, "जर सियाला हे लग्न मान्य नव्हतं, तर तिने सरळ नकार द्यायला हवा होता. आम्ही स्वतः हे लग्न मोडलं असतं. मात्र, तिने आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला."

त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा करत सांगितलं की, साखरपुड्यानंतर केतन आणि सिया यांचा परदेश दौरा ठरला होता. मात्र, प्रवासाच्या दिवशी केवळ केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला आणि त्याला विमानतळावरून परत यावं लागलं. आता हा प्रकारही पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या मते, घटनेच्या दिवशी सिया आणि चेतन यांनी लोहगडावर केतनच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला केला आणि त्यानंतर त्याला दरीत ढकलून दिलं.

दरम्यान, केतनच्या आईनेही सियावर विश्वासघाताचा आरोप करत, "ती आमच्या घरी यायची, आम्ही तिच्यासोबत खरेदीला आणि जेवायलाही गेलो होतो. ती इतकी कपटी निघेल, याचा कधीच विचार केला नव्हता. माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी सिया आणि तिचा प्रियकर जबाबदार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी," अशी भावनिक मागणी केली.

सुरुवातीला सिया गोयलने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा दावा करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केतन हा अनुभवी ट्रेकर असल्याने कुटुंबीयांना या कथनावर संशय आला. त्यानंतर केतनच्या बहिणीने सियाकडे केलेल्या चौकशीतून अनेक विसंगती समोर आल्या. तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी चेतन चौधरीला ताब्यात घेतलं. माहितीनुसार, 1 जानेवारी ते 18 जून या कालावधीत सिया गोयल ांनी चेतन चौधरी यांच्यात तब्बल 2000 फोन कॉल झाले होते. सांभाषणाचा एकूण कालावधी 238 तसांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला असून, दोन्ही आरोपींनी केतनची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या दोन्ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. केतनच्या कुटुंबीयांनी या खटल्याची फास्ट-ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #punecrime #ketanagrawal