मनाचे आरोग्य : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला हात मोबाईलवरच असतो. उठल्या उठल्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मग ऑफिसचे मेल, मग रील्स. दिवस कसा गेला कळतच नाही. कधी विचार केलाय का 24 तास मोबाईल पूर्ण बंद ठेवला तर काय होईल. सुरुवातीला विचित्र वाटेल, हात सारखा खिशाकडे जाईल, काहीतरी हरवल्यासारखे वाटेल, पण संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेगळीच शांतता जाणवायला लागेल.
1. झोप सुधारते. आपण रात्री झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल पाहतो, त्याच्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला वाटते अजून दिवस आहे. मोबाईल बंद असेल तर झोप लवकर लागते आणि सकाळी फ्रेश वाटते. अनेक लोक सांगतात फोन बंद ठेवल्यावर पहिल्यांदा 8 तास सलग झोप लागली.
2. कुटुंबासोबत खरा वेळ मिळतो. जेवताना, गप्पा मारताना आपण अर्धे लक्ष मोबाईलमध्ये असते. फोन नसेल तर समोरच्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण ऐकता येते. भांडणे कमी होतात, कारण समोरच्याला वाटते आपल्याला महत्त्व दिले जात आहे.
3. डोकेदुखी आणि डोळ्यांचा त्रास कमी होतो. दिवसभर स्क्रीन पाहून मान दुखणे, डोळे जळजळणे हे वाढले आहे. 24 तास ब्रेक मिळाला की डोळ्यांना आणि मानेला आराम मिळतो.
4. कामात लक्ष वाढते. ऑफिसचे काम असो किंवा घरचे, सतत नोटिफिकेशनमुळे काम तुटते. फोन बंद असेल तर एकच काम पूर्ण लक्ष देऊन होते, त्यामुळे काम लवकर संपते.
मनःशांती कशी मिळते
मोबाईलवर सतत दुसऱ्याचे आयुष्य पाहतो - कोणी फिरायला गेले, कोणी नवीन गाडी घेतली. त्यामुळे नकळत तुलना सुरू होते आणि मनात अस्वस्थता येते. फोन बंद असेल तर ही तुलना बंद होते. तुम्ही फक्त तुमच्या आजूबाजूला काय आहे तेच पाहता. चहा पिताना चहाची चव कळते, बाहेर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो. मन सतत धावत नाही, एका जागी स्थिर होते. यालाच खरी मनःशांती म्हणतात.
स्वतःसोबत वेळ आणि आत्मपरीक्षण
फोन नसल्यावर वेळ खूप जास्त वाटतो. मग आपण काय करतो - जुनी डायरी वाचतो, बाल्कनीत बसतो, काहीच न करता विचार करतो. तेव्हा लक्षात येते की आपल्याला काय आवडते, कशाचा राग येतो, कशात आनंद मिळतो. अनेकांना या 24 तासात कळते की आपण उगाच छोट्या गोष्टींवर चिडत होतो. काहीजण लिहायला लागतात, काहीजण चालायला जातात. स्वतःसोबत बसल्याने आपण स्वतःला प्रश्न विचारतो - मी खरंच खुश आहे का, मला काय बदलायचे आहे. हे आत्मपरीक्षण मोबाईल चालू असताना कधीच होत नाही.
स्वभाव आणि दिनचर्येत कसा बदल होतो
पहिला बदल म्हणजे सकाळची घाई कमी होते. मोबाईल नाही म्हणून सकाळी लवकर उठून चहा शांतपणे पिता येतो. दुसरा बदल म्हणजे चिडचिड कमी होते. सतत मेसेजला उत्तर द्यायचे टेन्शन नसते. तिसरा बदल म्हणजे बोलण्याची पद्धत बदलते. समोरच्याकडे पाहून बोलायला लागतो, ऐकण्याची सवय लागते.
दिनचर्येत छोटा प्रयोग करून पहा - रविवार निवडा. सकाळी 8 वाजता फोन स्विच ऑफ करा आणि सोमवारी सकाळी 8 वाजता ऑन करा. घरच्यांना आधी सांगा की गरज असेल तर लँडलाईनवर किंवा दुसऱ्या फोनवर कॉल करा. त्या दिवशी पुस्तक वाचा, स्वयंपाक करा, मित्रांना प्रत्यक्ष भेटा, झाडांना पाणी घाला.
सुरुवातीला अवघड वाटेल, पण 24 तासानंतर जेव्हा फोन ऑन कराल तेव्हा लक्षात येईल की जगात काहीच अडले नाही, पण तुमचे मन हलके झाले आहे. महिन्यातून एकदा हा फोन फास्ट करून पहा, डॉक्टर सांगतात यामुळे स्ट्रेस हार्मोन खूप कमी होतो.