LIFESTYLE : सोशल मीडियावर सध्या five to nine before nine to five हा ट्रेंड खूप चालू आहे. याचा अर्थ असा की नोकरीवर जाण्याआधी सकाळी पाच ते नऊ या वेळेत व्यायाम, वाचन, मेडिटेशन आणि जर्नल लिहिणे. अनेक मोठे उद्योगपती हे रुटीन फॉलो करतात म्हणून सामान्य लोकांना पण वाटते की लवकर उठले तर आपण पण यशस्वी होऊ. याचे काही फायदे नक्कीच आहेत. सकाळी गर्दी आणि गोंगाट नसताना तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता. त्यामुळे दिवसाची सुरुवात शांत होते आणि दिवसभर उत्साह राहतो. सकाळी व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होते जे दिवसभर आनंदी ठेवते.
पण हा रुटीन सगळ्यांसाठी योग्य आहे का हा खरा प्रश्न आहे. जर तुम्ही रात्री बारा वाजता झोपत असाल आणि सकाळी पाचला उठत असाल तर तुमची झोप फक्त पाच तास होते. अपूर्ण झोपेमुळे वजन वाढणे, चिडचिड होणे, आणि कामात चुका होणे असे त्रास सुरु होतात. डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे की सकाळी लवकर उठण्यापेक्षा सात ते आठ तास पूर्ण झोप घेणे जास्त महत्वाचे आहे. प्रत्येक माणसाची बॉडी क्लॉक वेगळी असते. काही लोक सकाळी जास्त अॅक्टिव्ह असतात त्यांना मॉर्निंग पर्सन म्हणतात, तर काही लोक रात्री उशिरा जास्त चांगले काम करतात त्यांना नाईट आउल म्हणतात. स्वतःच्या बॉडी क्लॉक च्या विरुद्ध जाऊन लवकर उठण्याचा प्रयत्न केला तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते.
नऊ ते पाच चा रुटीन वाईट नाही. जर तुम्ही ऑफिस मध्ये पूर्ण लक्ष देऊन काम करत असाल आणि संध्याकाळी कुटुंबाला वेळ देत असाल तर ते पण एक चांगले रुटीन आहे. सगळ्यांनीच पहाटे पाचला उठलेच पाहिजे असा कोणताही नियम नाही. तुमच्यासाठी योग्य काय हे ओळखण्यासाठी एक सोपा उपाय आहे. एक आठवडा पाचला उठून बघा आणि एक आठवडा सातला उठून बघा. ज्या आठवड्यात तुम्हाला जास्त फ्रेश आणि आनंदी वाटेल तेच रुटीन आयुष्यभर फॉलो करा. ट्रेंड च्या मागे लागू नका, स्वतःच्या शरीराचे ऐका.