Lifestyle : 40 नंतर महिलांमध्ये हे 5 बदल होतातच, वेळीच लक्ष दिले नाही तर त्रास वाढतो - टॉप न्यूज मराठी

40 हे वय महिलांसाठी खूप महत्त्वाचे असते. या वयापर्यंत मुलं मोठी झालेली असतात, जबाबदाऱ्या थोडी कमी झालेली असते, पण शरीरात मात्र अनेक बदल सुरू झालेले असतात. हे बदल बाहेरून लगेच दिसत नाहीत, पण आतून शरीर वेगळ्या टप्प्यात गेलेले असते. अनेक महिला या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर थकवा, दुखणे, चिडचिड याचा त्रास वाढतो. म्हणून हे 5 बदल कोणते आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.

1. मासिक पाळी अनियमित होणे

40 नंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे पाळी कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कधी जास्त दिवस रक्तस्त्राव होतो तर कधी खूप कमी होतो. हा मेनोपॉजच्या आधीचा काळ असतो ज्याला प्री मेनोपॉज म्हणतात. या काळात जास्त थकवा जाणवणे, पोटात दुखणे हे सामान्य आहे. जर रक्तस्त्राव खूप जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

2. हाडे कमकुवत होणे आणि सांधेदुखी

या वयात कॅल्शियम कमी शोषले जाते. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी सुरू होते. सकाळी उठल्यावर पाय जड वाटणे, जिना चढताना त्रास होणे असे प्रकार दिसतात. अनेक महिला याला वय झालं म्हणून सोडून देतात, पण हे चुकीचे आहे. रोज 20 मिनिटे ऊन, दूध, नाचणी, सोयाबीन आणि चालणे यामुळे हाडे मजबूत राहतात. कॅल्शियम आणि विटामिन डी तपासणी वर्षातून एकदा करावी.

3. वजन झपाट्याने वाढणे, विशेषतः पोटावर चरबी

40 नंतर चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मंदावते. आधी जितके खाल्ले तरी वजन वाढत नव्हते, पण आता थोडे जास्त खाल्ले तरी पोटावर चरबी जमा होते. याचे कारण हार्मोन बदल आणि हालचाल कमी होणे. यावर उपाय म्हणजे रात्रीचे जेवण हलके ठेवणे, साखर आणि मैदा कमी करणे आणि रोज 30 मिनिटे चालणे. पाणी जास्त पिणे खूप गरजेचे आहे.

4. मूड बदलणे, चिडचिड आणि झोप न येणे

अचानक राग येणे, छोट्या गोष्टीवरून रडू येणे, रात्री झोप न लागणे किंवा मध्येच जाग येणे, हे हार्मोन बदलामुळे होते. घरात सगळं ठीक असतानाही मन उदास वाटते. अनेक महिला याला टेन्शन समजतात. पण हा शारीरिक बदल आहे. यासाठी संध्याकाळी मोबाईल कमी वापरणे, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध, दीर्घ श्वास घेणे आणि मन मोकळं करण्यासाठी मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी बोलणे मदत करते.

5. केस गळणे आणि त्वचा कोरडी पडणे

इस्प्रोजेन कमी झाल्यामुळे केस पातळ होतात, केसात कोंडा वाढतो आणि त्वचा कोरडी पडते. चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसतात. यासाठी जास्त केमिकल असलेले शॅम्पू टाळा, खोबरेल तेलाने मालिश करा, आहारात आवळा, पेरू, पालक, अंडी असू द्या. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायल्यास त्वचेवर फरक दिसतो.

40 नंतर स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे स्वार्थ नाही, ती गरज आहे

आपल्या समाजात महिला स्वतःपेक्षा कुटुंबाचा जास्त विचार करतात. पण या वयात स्वतःची काळजी घेतली नाही तर पुढे शुगर, बीपी, थायरॉईड यांसारखे आजार लवकर येतात. म्हणून वर्षातून एकदा संपूर्ण रक्त तपासणी, थायरॉईड, शुगर, हिमोग्लोबिन चेक करा. रोज स्वतःसाठी अर्धा तास काढा.