Leap Year Proposal : या देशात लग्नासाठी मुलीच मुलाला मागणी घालते, नकार दिला तर मुलाला होते शिक्षा - टॉप न्यूज मराठी

जगामध्ये लग्नाच्या अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत. आपल्याकडे सहसा मुलाकडून मुलीला लग्नाची मागणी घातली जाते. पण जगात काही देश असे आहेत जिथे याच्या उलट होते. तिथे मुलीच मुलांना लग्नासाठी प्रपोज करतात आणि जर मुलाने नकार दिला तर त्याला दंड भरावा लागतो.

ही परंपरा मुख्यतः युरोपमधील देशांमध्ये आहे. आयर्लंड, स्कॉटलंड आणि फिनलँड या देशांमध्ये लीप वर्षाच्या दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारीला मुली मुलांना प्रपोज करतात. याला लीप इयर प्रपोजल असे म्हणतात.

या परंपरेमागे एक कथा सांगितली जाते. पाचव्या शतकात आयर्लंडमध्ये सेंट ब्रिजेट यांनी सेंट पॅट्रिक यांच्याकडे तक्रार केली की मुलींना मुलाच्या प्रपोजलची खूप वाट पाहावी लागते. त्यावर सेंट पॅट्रिक यांनी 29 फेब्रुवारी हा दिवस मुलींसाठी राखीव केला. या दिवशी मुली मुलांना प्रपोज करू शकतात असे त्यांनी जाहीर केले.

आता शिक्षा कोणती असते तर जर मुलाने मुलीचे प्रपोजल नाकारले तर त्याला दंड द्यावा लागतो. फिनलँडमध्ये परंपरेनुसार मुलाने मुलीला स्कर्ट बनवण्यासाठी लागेल एवढे कापड विकत देऊन द्यायचे असते. स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये ही शिक्षा थोडी वेगळी आहे. तिथे नकार देणाऱ्या मुलाला मुलीला एक जोडी हातमोजे, एक किस किंवा सिल्कचा ड्रेस किंवा 100 पौंड पर्यंत दंड द्यावा लागतो.

या परंपरेचा अजून एक प्रकार आफ्रिका खंडातील चाड या देशातील मंगालमे भागात पाहायला मिळतो. तिथे लग्नाचे प्रस्ताव नाकारणे हा गुन्हा मानला जातो. तिथे याला आमचिलिनी असे म्हणतात. जर कोणी लग्नाचा प्रस्ताव नाकारला तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड महिलांसाठी 23 ते 39 डॉलर आणि पुरुषांसाठी 15 डॉलर इतका आहे. मात्र या कायद्याला तिथे विरोध होत आहे. महिला हक्क संघटनांचे म्हणणे आहे की हा कायदा लग्नाच्या संमतीच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.

या परंपरा आजही काही ठिकाणी पाळल्या जातात. जरी आता कायदेशीर बंधन नसले तरी हा एक मजेदार रिवाज म्हणून साजरा केला जातो. लीप वर्षाच्या दिवशी अनेक ठिकाणी महिला मुलांना प्रपोज करण्यासाठी पुढे येतात आणि हा दिवस सेलिब्रेट केला जातो.

डिस्क्लेमर - या लेखातील माहिती विविध ऐतिहासिक लेख, विकिपीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. या परंपरा संबंधित देशातील लोककथा आणि जुन्या रिवाजांवर आधारित आहेत.