Latur : दुष्काळाचा पहिला बळी, कर्जाच्या ओझ्याने होरपळलेल्या 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या - टॉप न्यूज मराठी

लातूर - जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आता जीव घेऊ लागल्या आहेत. खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यात घडली आहे.

राणी अंकुल्गा गावचा रहिवासी दत्ता सूर्यकांत कुंभार, वय 28 वर्षे. घरची परिस्थिती बेताची, शेती दुष्काळाने करपलेली. कुटुंब चालवण्यासाठी दत्ताने चार वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून सुमारे 6 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला हप्ते भरले, पण व्याज वाढत गेले आणि वसुलीचा तगादा सुरू झाला.

27 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दत्ताने राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं. घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्याने लिहिलं आहे की, दुष्काळामुळे मी कर्जबाजारी झालो आहे, मी मोठ्या संकटात आहे. इक्विटास बँक, रिंग ॲप, एचडीएफसी बँक निलंगा आणि श्रीराम फायनान्सकडून ईएमआयसाठी माझा छळ होत आहे, त्यामुळे हे पाऊल उचलत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका आणि माझं कर्ज माफ करून त्यांना मदत करा, अशी विनंतीही त्याने सरकारकडे केली आहे.

दत्ता हा घरातील एकमेव कमावता आधार होता. त्याच्या जाण्याने आई, पत्नी आणि दोन लहान मुलांचा आधारच हरपला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरूर अनंतपाळ येथील रुग्णालयात पाठवला असून शिरूर अनंतपाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिनिधी असलम शेख लातूर