Vikas Khanna Partners With Kolkata Chai Co: भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर नेणारे प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांनी आता बिझनेस जगतात एक मोठी झेप घेतली आहे. विकास खन्ना यांच्या बंगलो हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट्स या समूहाने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय चवीचे खाद्यपदार्थ आणि चहासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कलकत्ता चाय कंपनी’ या स्टार्ट अपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
या ऐतिहासिक भागीदारीमुळे हा ब्रँड आता अमेरिकेतील प्रमुख शहरांमधील रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये आपला खास 'भारतीय मसाला चहा' अधिकृतपणे सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यास सज्ज झाला आहे.
हसन मिन्हाजनंतर आता विकास खन्ना यांची साथ
'कलकत्ता चाय कंपनी'ची स्थापना अमेरिकेत भारतीय चहाची खरी चव पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. काही काळापूर्वी प्रसिद्ध अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता हसन मिन्हाज याने या कंपनीत मोठी भागीदारी करत गुंतवणूक केली होती. हसन मिन्हाजनंतर आता जागतिक कीर्तीचे शेफ विकास खन्ना देखील या ब्रँडशी जोडले गेल्यामुळे अमेरिकेतील फूड इंडस्ट्रीत या स्टार्टअपची ताकद आणखी वाढली आहे.
अमेरिकेत वाढणार भारतीय चहाचा डंका
विकास खन्ना यांच्या बंगलोहॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट्स सोबत झालेल्या या नव्या करारामुळे कलकत्ता चाय कंपनीला मोठा फायदा होणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी आपला विस्तार केवळ स्वतःच्या कॅफेपुरता मर्यादित न ठेवता अमेरिकेतील आघाडीच्या फाईन-डाइनिंग आणि मुख्य रेस्टॉरंट्समध्ये करणार आहे. अमेरिकन नागरिकांना आणि तेथील भारतीय स्थलांतरितांना उच्च दर्जाचा, हाताने तयार केलेला अस्सल कोलकाता शैलीतील मसाला चहा आणि स्ट्रीट फूडचा आस्वाद घेता येईल. विकास खन्ना यांचे नाव जोडले गेल्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत या उत्पादनांची विश्वासार्हता आणि मागणी झपाट्याने वाढेल.