कोल्हापूर: गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता पुन्हा कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणाची सुनावणी 3 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. न्यायालयाने महायुतीचे 12 आणि शासन नियुक्त चार अशा सर्व 16 संचालकांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
आजच्या सुनावणीत समविचारी आघाडीने मूळ याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली. अध्यक्ष निवडीपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडी रेकॉर्डवर आणायच्या होत्या. याला महायुतीच्या वकिलांनी विरोध केला. मात्र कोर्टाने सर्व घटना अंतिम निर्णयाला अधीन राहतील, या अटीवर दुरुस्तीला परवानगी दिली.
महायुतीच्या वकिलांनी काही संचालकांना नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे का, असा सवाल कोर्टाने केला. त्यानंतर गोकुळ प्रशासनाने सर्वांना सर्व माध्यमातून नोटीस पाठवावी, असे आदेश दिले. नोटीस मिळूनही संचालक हजर झाले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी सुरू होईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे 13 तर महायुतीचे 12 सदस्य निवडून आले होते. अध्यक्ष सतेज पाटील गटाचा होणार हे जवळपास निश्चित असताना शासनाने ऐनवेळी चार तज्ज्ञ संचालक नियुक्त केले. त्यांना मतदानाचा अधिकारही दिला. त्यांच्या मदतीने महायुतीचा अध्यक्ष बसला. याच आदेशाला सतेज पाटील गटाने कोर्टात आव्हान दिले आहे. याआधी कोर्टाने चार संचालकांची मते वेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, या प्रकरणात वकिलांची फी म्हणून 80 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. दुष्काळात शेतकरी अडचणीत असताना ही उधळपट्टी असल्याचे ते म्हणाले.