पुणे : पुण्यामध्ये सध्या केतन अगरवाल हे तरुणाच्या हत्येने अनेक चर्चांना उधाण आले आहे. आज संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघा जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोघांविरुद्धही सबळ पुरावे मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सियाचे घरदार पिंजून काढले आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
2 जुलै रोजी सिया गोयल हिच्या घरी जाऊन पोलिसांनी तासभर झाडाझडती घेतली. यामध्ये तिने घटनेच्या दिवशी घातलेले कपडे देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर चेतन आणि सीआ या दोघांनी केतनला कसे ढकलून द्यायचे याचा सराव ज्या ठिकाणी केला तिथे जाऊन देखील रिक्रिएशन केले आहे. दरम्यान सिया गोयल हिला तिच्या घरातून पुन्हा कोठडीत नेत असताना तिने माध्यमांना मिडल फिंगर दाखवून अश्लील हातवारे केले आहेत.
आज तीन जुलैला दोन्हीही संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोघांनाही वाढीव पोलीस कोठडी पोलिसांनी मागून घेतली होती. यामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी आणि साक्षीदारांच्या जबाब नोंदवून घेण्यासाठी वेळ मागून घेण्यात आली होती. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे या दोघांसह या गटांमध्ये आणखीन एक जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने देखील पोलिसांच्या तपासाची सूत्र फिरली होती. आज न्यायालयामध्ये पोलीस कोणते पुरावे सादर करतात तिसरा संशयित आरोपी कोण याबाबत खुलासा होऊ शकेल.
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. सिया गोयलला हे लग्न मान्य नव्हते. केतन हा विग लावतो आणि बोलताना अडखळतो अशा कारणांमुळे तिने केतन सोबत लग्न करायचे नाही असे मनोमन ठरवले. त्याचबरोबर चेतन चौधरी या आपल्या प्रियकरा सोबत तिला लग्न करायचे होते. या महत्त्वाच्या कारणाने दोघांनी मिळून केतन अग्रवाल यास कट रचून संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही केतनला मारण्याचा याआधीही प्रयत्न केला होता. परंतु 18 जून रोजी लोहगडावरून 300 फूट दरीमध्ये ढकलून देण्यामध्ये दोघांना यश आलं. आधी सियान केतन घसरून पडल्याचा बनाव केला. परंतु त्याच्या बहिणीला सियावर आलेल्या संशयाने तपासाची सूत्र आणखी वेगाने फिरली आणि या प्रकरणांमध्ये आता सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे अटकेत आहेत. आज दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असून तिसरा संशयित आरोपी कोण आणि आज न्यायालयात नेमके काय घडते? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.