Ketan Agrawal Murder Update: ‘तुला नाही जमणार, आता मीच संपवतो...’ केतन अग्रवाल हत्येच्या कटाचे धक्कादायक तपशील उघड - टॉप न्यूज मराठी

केतनला मारण्याचे तीन प्रयत्न फसले; अखेर 18 जूनला लोहगड किल्ल्यावर पूर्वनियोजित कट रचून हत्या, आरोपींना पश्चाताप नसल्याची कबुली

लोहगड किल्ल्यावरून तरुण व्यावसायिक केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे तपासातून समोर आले असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन यांनी केतनला संपवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट काही आठवड्यांपूर्वीच रचण्यात आला होता. 31 मे रोजी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी निर्जन ठिकाणी केतनला दरीत ढकलून मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा बेत होता. मात्र, ऐनवेळी सियाचे धाडस झाले नाही आणि पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर 4 जूनसाठी दुसरी योजना आखण्यात आली, परंतु तीदेखील प्रत्यक्षात येऊ शकली नाही. 14 जून रोजी सिया आणि केतन पुन्हा एकदा लोहगडावर गेले. यावेळीही केतनला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सियाने साप दिसल्याचे नाटक केल्याने हा कट पुन्हा अयशस्वी ठरला.

दरम्यान, सिया आणि केतन यांनी बालीला जाण्याचा प्लान केला होता. मात्र, या सहलीदरम्यान सियाने केतनचा पासपोर्ट फाडून तो टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची परदेशवारी रद्द झाली आणि दोघांमधील वाद अधिकच वाढल्याचे तपासात समोर आले आहे. केतनला संपवण्याचे सलग तीन प्रयत्न फसल्यामुळे चेतन संतापला होता. 14 जूनचा कट अयशस्वी झाल्यानंतर त्याने सियाला, “हे काम तुला जमणार नाही, आता केतनला मीच संपवतो,” असे सांगितल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

अखेर 18 जून रोजी हा कट प्रत्यक्षात उतरवण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी चेतनने प्रथमच एकट्याने लोहगड किल्ल्याला भेट दिली. तपास चुकवण्यासाठी त्याने स्वतःच्या ऐवजी आपल्या कर्मचाऱ्याचा मोबाईल वापरल्याचाही आरोप आहे. तसेच, दिवसभर सिया आणि चेतन यांच्यात मेसेजद्वारे सतत संपर्क होता. हे डिजिटल पुरावे आता तपासातील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत.

19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता आणि केतन तिला महाबळेश्वरला घेऊन जाणार होता. मात्र, हे होऊ नये अशी चेतनची इच्छा असल्याने हत्येसाठी 18 जूनची तारीख निवडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीदरम्यान सियाने केतनशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, केतनच्या मृत्यूबद्दल दोन्ही आरोपींना कोणताही पश्चाताप नसल्याचे त्यांनी पोलिसांसमोर सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोघेही एकमेकांवर केतनला दरीत ढकलल्याचा आरोप करत असून, पोलिसांकडून डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #lohgadmurdercase #ketanagrawal #siyagoyal