पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता अत्याधुनिक फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चेतन चौधरीच्या ‘गेट ॲनालिसिस’ची, म्हणजेच चालण्याच्या पद्धतीच्या न्यायवैद्यक तपासणीची तयारी पोलीस करत आहेत. लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि चेतन यांची चालण्याची पद्धत जुळते का, याची पडताळणी या प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने हुडी परिधान केली होती, त्यामुळे चेहरा स्पष्टपणे ओळखणे कठीण झाले. अशा परिस्थितीत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी ‘गेट ॲनालिसिस’ हे महत्त्वाचे फॉरेन्सिक साधन मानले जाते.
यासाठी पोलिसांकडून चेतनला त्याच प्रकारची हुडी घालून चालण्यास सांगितले जाणार आहे. त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजशी तांत्रिकदृष्ट्या तुलना करण्यात येणार असल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली.
दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासाचे अनेक महत्त्वाचे पैलू अद्याप प्रलंबित असल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली. तपासादरम्यान पोलिसांकडून नष्ट करण्यात आलेला डिजिटल डेटा पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, केतन अग्रवालचा हरवलेला पासपोर्ट, आरोपींच्या परस्पर भेटीगाठी आणि घटनेपूर्वीच्या हालचाली यांचाही तपास केला जात आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात असा दावा केला की, आरोपींनी यापूर्वी लोहगड किल्ल्याला भेट देऊन काही ठिकाणांची पाहणी केली होती. त्या संदर्भातील तपशील आणि त्यांच्या कथित हालचालींची पडताळणी करण्यासाठी अधिक चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
याशिवाय, पोलिसांनी यापूर्वी सिया गोयलच्या जबाबाच्या आधारे लोहगडावर जाऊन घटनेचे पुनर्निर्माण (सीन रिक्रिएशन) केले होते. आता चेतन चौधरीच्या जबाबाशी त्या माहितीची तुलना करून तपास पुढे नेला जाणार आहे. या प्रकरणात डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तंत्रज्ञान आणि आरोपींच्या हालचालींची सांगड घालत तपास यंत्रणा सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #punecrime #lohgadmurdercase #chetanchaudhary #siyagoyal