Ketan Agrawal Murder Case: ‘सियाने एकदा सांगितलं असतं तर हे लग्नच झालं नसतं’; केतन हत्याप्रकरणी बहिणीच्या भावाचा मोठा दावा - टॉप न्यूज मराठी

चेतनसोबतच्या नात्याला आमचा विरोध नव्हता’; चौकशीत सियाच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर मांडली भूमिका

पुण्यातील उद्योजक कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, तिचा भाऊ साहील गोयल याने चौकशीदरम्यान केलेल्या विधानामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी सिया गोयलचे आई-वडील आणि भाऊ साहील यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या चौकशीत साहील गोयल याची सुमारे दहा तास विचारपूस करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, साहीलने पोलिसांना सांगितले की, सियाने कधीही तिला केतनसोबत लग्न करायचे नाही, अशी इच्छा कुटुंबीयांसमोर व्यक्त केली नव्हती. तिने तिच्या मनातील गोष्ट आधी सांगितली असती, तर कुटुंबाने हे लग्न पुढे नेले नसते, असा दावा त्याने केला आहे. साहीलने आणखी एक महत्त्वाची बाब पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, चेतन चौधरी हा त्यांच्या समाजातील असून त्याचे कुटुंबही व्यावसायिक आहे. त्यामुळे सिया आणि चेतन यांच्या नात्याला कुटुंबाचा विरोध असण्याचे कारण नव्हते. सियाने तिची इच्छा स्पष्टपणे सांगितली असती, तर तिचे लग्न चेतनसोबत लावून देण्यासही कुटुंबाची तयारी होती, असे त्याने म्हटल्याचे समजते.

दरम्यान, सियाचे वडीलही चौकशीत म्हणाले की, मुलगी या लग्नाबाबत आनंदी नाही किंवा तिला केतन आवडत नाही, अशी कोणतीही कल्पना कुटुंबाला नव्हती. जर तिने तिची नाराजी व्यक्त केली असती, तर हे लग्न घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले नसते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या पार्श्वभूमीवर सियाने तिच्या कुटुंबीयांपासून तिच्या मनातील गोष्टी का लपवल्या आणि नेमके कोणत्या कारणांमुळे ही घटना घडली, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांकडून डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #lohgadmurdercase #ketanagrawal #siyalgoyal #chetanchaudhary