केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी संपूर्ण कटाची 'रंगीत तालीम' केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित होती का, याबाबतचा संशय अधिक गडद झाला आहे.
तपासातील माहितीनुसार, 31 मे रोजी सिया पहिल्यांदा लोहगडावर गेली होती. याच भेटीदरम्यान केतनला संपवण्याचा कट तिच्या डोक्यात शिजल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर 14 जून रोजी सिया पुन्हा लोहगडावर गेली आणि तिने घटनास्थळाची सविस्तर रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी केतन नेमका कुठे उभा राहील, चेतन कोणत्या दिशेने येईल, सिया कुठून धक्का देईल आणि घटना घडल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून कशा पद्धतीने बाहेर पडायचे, याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. इतकेच नव्हे, तर हा प्लॅन प्रत्यक्षात कसा राबवायचा यासाठी सिया आणि चेतन यांनी एका ठिकाणी भेटून रंगीत तालीम केल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. सियाने इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी किंवा गंभीर इजा पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींबाबत माहिती शोधल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. या डिजिटल पुराव्यांचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, त्याचा तपासात महत्त्वाचा भाग म्हणून विचार केला जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण केवळ अपघात नसून, त्यामागे पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. पोलिसांकडून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे.