भटकंती : सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर वसलेलं कास पठार हे महाराष्ट्राचं वैभव आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या या पठाराला युनेस्कोने नैसर्गिक जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ऑगस्टच्या शेवटापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे 10 चौरस किमीचं पठार एखाद्या रंगीबेरंगी गालीच्यासारखं दिसतं. म्हणूनच याला ‘महाराष्ट्राची फुलांची दरी’ म्हणतात. निसर्गप्रेमींसाठी कास पठार म्हणजे अद्भुत नजाराचं !
कास पठार हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला बेसाल्ट खडकाचा पठारी प्रदेश आहे. इथली जमीन जांभी आणि पावसाचं पाणी साठून न राहणारी आहे. त्यामुळेच इथे दुर्मिळ वनस्पती वाढतात. पावसाळ्यात इथलं तापमान 18 ते 25 अंशांच्या आसपास असतं. धुकं, हलका पाऊस आणि थंड वारा यामुळे फुलं बघण्याचा अनुभव अविस्मरणीय होतो. या काळातच इथली जैवविविधता जागी होते.
कासवर 850 पेक्षा जास्त प्रजातींची फुले आढळतात, त्यापैकी 40 पेक्षा जास्त फक्त इथेच सापडतात.
सोनकी : पिवळ्या रंगाचा गालीचा
टोपली कार्वी आणि कर्वी : 7 वर्षातून एकदा फुलणारी जांभळी फुले
स्मिथिया (Mickey Mouse Flower), अबोली, पांढरी चवर, इम्पेशन्स लॉई, निशिगंध
मांसाहारी वनस्पती : ड्रॉसेरा इंडिका आणि युट्रिक्युलेरिया सारखी कीटकभक्षी फुलेही इथे दिसतात.
प्रत्येक आठवड्याला फुलांचा रंग बदलतो, त्यामुळे दोन वेळा गेलं तरी वेगळं दृश्य दिसतं.
शहराच्या धावपळीतून 1 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असेल तर कास पठार बेस्ट आहे. फोटोग्राफर्ससाठी हे नंदनवन आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात दवबिंदूंनी भरलेली फुले, फुलपाखरं, आणि मागे कास तलाव यांचा फोटो अप्रतिम येतो. शिवाय इथे प्लास्टिक बंदी आणि ठराविक पायवाटेवरूनच फिरण्याची शिस्त असल्याने निसर्ग जपला जातो.
पुण्यातून कास पठार - अंतर आणि कसे पोहोचायचे ?
पुण्यातून कास पठाराचे अंतर 135 किमी आहे, वेळ सुमारे 3 ते 3.5 तास.
1. स्वतःच्या गाडीने: पुणे > NH48 > सातारा > कास रस्ता. साताऱ्यापासून शेवटचे 25 किमी घाटाचा रस्ता आहे, अतिशय निसर्गरम्य.
2. पब्लिक ट्रान्सपोर्टने: पुण्याहून सातारा ST किंवा रेल्वे. स्वारगेटहून दर अर्ध्या तासाला सातारा बस आहे. सातारा रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावरून काससाठी शेअर जीप, लोकल बस (बामणोली/टेटलीकडे जाणारी) किंवा खाजगी टॅक्सी मिळते. पहाटे 6 वाजल्यापासून जीप सुरू होतात.
3. महत्वाचे : स्वतःच्या गाड्या पठारावर नेत नाहीत. बेस पार्किंगला लावून तिथून वन विभागाची मोफत शटल बस पठाराच्या गेटपर्यंत नेते. ऑनलाईन तिकीट बुकिंग अनिवार्य आहे - दिवसाला फक्त 3000 पर्यटकांना प्रवेश, तिकीट 100 रुपये. वेळ - सकाळी 7 ते सायंकाळी 6, 3 स्लॉटमध्ये.
राहण्याची आणि खाण्याची सोय:
कास पठारावर राहण्याची सोय नाही. राहण्यासाठी सातारा शहर (25 किमी) बेस्ट आहे. निसर्ग अनुभव हवा असेल तर बामणोली गावात (14 किमी) होमस्टे आणि अॅग्रो टुरिझम टेंट आहेत. तिथे झुणका-भाकरी, पिठलं आणि शेतातील ताजं जेवण मिळतं. कास तलावाजवळ बोटिंग आणि सज्जनगड, ठोसेघर धबधबा ही जवळची ठिकाणं पाहू शकता. पावसाळ्यात एकदा तरी कासची ही फुलांची चादर डोळ्यांनी पाहायलाच हवी.