INFORMATIVE : जर तुम्ही कारने नेहमी हायवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारच्या FASTag Annual Pass योजनेने एक मोठा टप्पा पार केला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या या पासचे आतापर्यंत 1 कोटी पास विकले गेले आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
हा एक असा पास आहे ज्यामध्ये तुम्हाला वारंवार FASTag रिचार्ज करावा लागत नाही. तुम्ही एकदा 3075 रुपये भरले की तुमचा आहे त्याच FASTag वर हा पास अॅक्टिव्ह होतो. यानंतर तुम्हाला 1 वर्षासाठी किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. यापैकी जे आधी संपेल ते ग्राह्य धरले जाते. सुरुवातीला याची किंमत 3000 रुपये होती, एप्रिल 2026 मध्ये ती वाढवून 3075 रुपये करण्यात आली आहे. दरवर्षी यात थोडी वाढ होऊ शकते.
हा पास फक्त खासगी नॉन कमर्शियल गाड्यांसाठी आहे. म्हणजे तुमची कार, जीप किंवा व्हॅन असेल तरच तुम्ही हा पास घेऊ शकता. ट्रक किंवा कमर्शियल टॅक्सीला हा पास मिळत नाही. हा पास देशातील सुमारे 1150 टोल नाक्यांवर चालतो. हे सर्व टोल नाके नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेसवेवर आहेत. स्टेट हायवे किंवा महानगरपालिकेच्या टोलवर हा पास चालत नाही.
समजा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करता. एका बाजूला सुमारे 300 रुपये टोल लागतो. रोज ये जा केल्यास एका दिवसाचा 600 रुपये. अशा वेळी 200 क्रॉसिंग म्हणजे 100 दिवस ये जा करणे. याचा खर्च 60 हजार रुपये होतो. पण Annual Pass मध्ये तोच प्रवास फक्त 3075 रुपयात होतो. म्हणजे 57 हजार रुपयांची बचत. जर तुम्ही महिन्यातून 4 वेळा हायवे वापरत असाल म्हणजे वर्षाला 48 क्रॉसिंग. सरासरी टोल 80 रुपये धरला तरी 3840 रुपये होतात. अशा वेळी 3075 चा पास फायद्याचा आहे. पण तुम्ही वर्षातून 2 ते 3 वेळाच हायवेवर जात असाल तर हा पास घेण्याची गरज नाही. कारण 200 क्रॉसिंग होणारच नाहीत आणि 1 वर्षानंतर पास संपून जाईल.
तुम्हाला कोणताही नवीन FASTag घ्यायचा नाही. Rajmargyatra App डाउनलोड करा किंवा NHAI च्या वेबसाईटवर जा. तिथे तुमचा गाडी नंबर टाका. 3075 रुपये ऑनलाईन भरा. 2 तासात तुमच्या आहे त्याच FASTag वर हा पास अॅक्टिव्ह होईल. गेल्या दिवाळीपासून तुम्ही हा पास दुसऱ्याला गिफ्ट देखील करू शकता. मंत्रालयाने सांगितले की वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप इकॉनॉमिकल आहे आणि टोलवर थांबण्याचा वेळ देखील वाचतो. सरकारने 2027 पर्यंत टोल नाके बॅरियर फ्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.