Informative : आधारवर किती सिम आहेत ते आत्ताच चेक करा, अनोळखी नंबर असेल तर 72 तासात होईल बंद - टॉप न्यूज मराठी

पुणे - तुमच्या आधार कार्डवर तुमच्या नकळत दुसरेच कोणीतरी सिम वापरत असल्याचा प्रकार वाढला आहे. सायबर गुन्हेगार बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम घेऊन फसवणूक करत आहेत. याला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने संचार साथी पोर्टल सुरू केले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधारवर किती सिम सक्रिय आहेत हे घरबसल्या पाहू शकता. यासाठी tafcop.sancharsaathi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करावे लागते. लॉगिन होताच आधारला जोडलेल्या सर्व नंबरची यादी, कंपनीचे नाव आणि राज्य समोर येते.

नियमानुसार एका व्यक्तीला एका आधारवर जास्तीत जास्त 9 सिम घेता येतात. यापेक्षा जास्त सिम आढळल्यास तो गैरवापर समजला जातो. जर यादीत कोणताही अनोळखी नंबर दिसला तर This is not my number किंवा Not required या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तो नंबर बंद करण्यासाठी रिपोर्ट करू शकता.

तक्रार केल्यानंतर 72 तासात टेलिकॉम कंपनीकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर तो नंबर कायमचा ब्लॉक केला जातो. नागरिकांनी महिन्यातून एकदा तरी आपले सिम कार्ड चेक करावे, अन्यथा तुमच्या नावावरील सिमचा वापर करून गुन्हा घडल्यास पहिली नोटीस तुम्हालाच येईल, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.