INFORMATIVE : कागदपत्रे हरवली की आपल्याला सगळ्यात आधी टेन्शन येते. आता कुठे जायचे, किती पैसे लागतील, किती दिवस लागतील, असा विचार येतो. पण आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमची सगळी महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनच मिळवू शकता.
आधार कार्ड हरवले असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे mAadhaar अॅप किंवा uidai ची वेबसाईट. तिथे तुमचा आधार नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला आधार डाऊनलोड करता येतो. आधार नंबरही लक्षात नसेल तर मोबाईल नंबरवरून आधार नंबर शोधता येतो. ही पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंट काढली तर ती मूळ आधारसारखीच चालते.
पॅन कार्ड हरवले असेल तर NSDL च्या वेबसाईटवर जाऊन डुप्लिकेट पॅनसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी साधारण 50 रुपये फी असते. अर्ज केल्यानंतर 10 ते 15 दिवसांत नवीन पॅन कार्ड घरी येते. तोपर्यंत तुम्हाला ई पॅन मिळतो, तोही सर्व कामांसाठी चालतो.
मतदार ओळखपत्र हरवले असेल तर voter helpline अॅपवरून नवीन कार्ड मिळवता येते. अॅपमध्ये तुमचे नाव, मतदारसंघ टाकून कार्ड डाऊनलोड करता येते. यासाठी कोणतीही फी लागत नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर परिवहन वेबसाईटवरून डुप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज करता येतो. यासाठी जवळच्या आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही, ऑनलाईनच अर्ज होतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची कागदपत्रे DigiLocker अॅपमध्ये आधीच सेव्ह करून ठेवा. DigiLocker मधील कागदपत्रे सरकारी कामांसाठी मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात. त्यामुळे पुढच्या वेळी कार्ड हरवले तरी घाबरायची गरज पडणार नाही.