Indigo Launched Indigo Lite: आजपासून स्वस्तात बुक करा विमानप्रवास; इंडिगोची नवी 'लाइट' सेवा सुरू, देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय तिकिटांवरही बचतीची संधी - टॉप न्यूज मराठी

आजपासून स्वस्तात बुक करा विमानप्रवास; इंडिगोची नवी 'लाइट' सेवा सुरू, देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय तिकिटांवरही बचतीची संधी

विमानप्रवास कमी खर्चात करण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांसाठी इंडिगोने नवी सुविधा सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या देशांतर्गत विमान कंपनीने 'इंडिगो लाइट' या नावाने नवीन भाडे पर्याय सादर केला असून, त्याअंतर्गत कमी सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट बुक करता येणार आहे. या योजनेअंतर्गत बुकिंगला 1 जुलैपासून सुरुवात झाली असून, 15 जुलैपासूनच्या प्रवासासाठी ही सुविधा लागू असेल.

कंपनीच्या माहितीनुसार, ही सुविधा इकॉनॉमी क्लासमधील अशा प्रवाशांसाठी आहे जे फक्त केबिन बॅगेजसह प्रवास करतात. चेक-इन बॅगेजची गरज नसलेल्या प्रवाशांना तुलनेने कमी दरात तिकीट उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.

'इंडिगो लाइट' अंतर्गत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या प्रवासासाठी तिकिटे उपलब्ध असतील. वन-वे, राउंड-ट्रिप आणि मल्टी-सिटी अशा नॉन-स्टॉप प्रवासाच्या पर्यायांसाठीही ही सुविधा लागू राहणार आहे. प्रौढांसोबतच मुलांसाठीही या श्रेणीत बुकिंग करता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या योजनेतील तिकिटे केवळ इंडिगोच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप आणि संपर्क केंद्रामार्फतच बुक करता येतील. इतर कोणत्याही तृतीय-पक्ष बुकिंग प्लॅटफॉर्मवर हे विशेष भाडे उपलब्ध नसेल.

दरम्यान, केंद्र सरकारने 1 जुलैपासून विमान इंधन (ATF) दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात केली आहे. तसेच काही पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्कातही बदल करण्यात आला आहे. या निर्णयाचा विमान कंपन्यांच्या खर्चावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंडिगोने स्पष्ट केले आहे की, 'इंडिगो लाइट' निवडणाऱ्या प्रवाशांना कंपनीच्या ब्लूचिप लॉयल्टी प्रोग्रामचे सर्व लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. त्यामुळे कमी सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना खर्चात बचत करणारा पर्याय ठरू शकते.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #indigoairline