मुंबई : श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर टीम इंडियाच्या कसोटी संघावर शिक्कामोर्तब झालं. बीसीआयने आज 2 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. शुभमन गिल कर्णधार आणि केएल राहुल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळतील.
सगळ्यात मोठं नाव म्हणजे सर रवींद्र जडेजा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 26 नोव्हेंबर 2025 नंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं नव्हतं. जवळपास 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता तो पुन्हा पांढऱ्या जर्सीत दिसेल. 15 ऑगस्टला गॉलमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यापर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय कसोटी खेळून 262 दिवस झाले असतील.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या वनडेत गुडघ्याला मार लागल्यामुळे जसप्रीत बुमराह शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्यासोबत साई सुदर्शनलाही संघात घेतलं आहे. मात्र NCA मधून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच हे दोघे श्रीलंकेत खेळू शकतील.
मध्य प्रदेशच्या सारांशची एन्ट्री
या दौऱ्यात एक नवीन चेहरा देखील दिसणार आहे. मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज सारांश जैन याला पहिल्यांदाच भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर मात्र वैयक्तिक कारणांमुळे या दौऱ्यातून बाहेर आहे.
शुभमन गिल (कर्णधार),
केएल राहुल (उपकर्णधार),
यशस्वी जयस्वाल,
ऋषभ पंत,
साई सुदर्शन,
ध्रुव जुरेल,
रवींद्र जडेजा,
कुलदीप यादव,
मानव सुथार,
जसप्रीत बुमराह,
मोहम्मद सिराज,
प्रसिद्ध कृष्णा,
गुरनूर ब्रार,
देवदत्त पडिक्कल,
सारांश जैन.
सामने कधी आणि कुठे होणार ?
ही मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होईल. पहिला सामना गॉलमध्ये 15-19 ऑगस्ट दरम्यान आणि दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवला जाईल. दोन्ही सामन्यांना सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. तरुण कर्णधार गिल आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणासह भारत श्रीलंकेत बाजी मारू शकेल का, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
https://x.com/BCCI/status/2081945448655536582?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2081945448655536582%7Ctwgr%5Ef7fe16c74924d519c835ee997bf48be21447a36e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fsports%2Fbcci-annouced-india-squad-for-tour-of-sri-lanka-1721227.html