चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांच्या घरांच्या बुकिंगमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'डीएलएफ'च्या (DLF) बुकिंगमध्ये तब्बल ९४.२४ टक्क्यांची प्रचंड घसरण झाली असून कंपनीची विक्री अवघी ६५७ कोटी रुपयांवर स्थिरावली आहे. डीएलएफ पाठोपाठ प्रेस्टिज इस्टेट्सच्या बुकिंगमध्ये ४६ टक्क्यांची घट होऊन ती ६,५७९ कोटी रुपयांवर आली आहे, तर ओबेरॉय रियल्टीची बुकिंग ३५.९ टक्क्यांनी घसरून १,०४९.८८ कोटी रुपयांवर राहिली आहे. रिअल इस्टेट विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या मते, विक्रीतील ही मंदी बाजारात घरांची मागणी कमी झाल्यामुळे आलेली नाही. तर नवीन गृहप्रकल्पांचे लाँचिंग मर्यादित असणे, नवीन प्रोजेक्ट्सची सुरुवात आणि प्रशासकीय मंजुरी मिळण्यास झालेला कमालीचा उशीर ही यामागील दोन मुख्य कारणे आहेत. पहिल्या तिमाहीत ज्या नवीन प्रोजेक्ट्सचे लाँचिंग झाले, त्यांना खरेदीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या संमिश्र कामगिरीच्या काळातही 'गोदरेज प्रॉपर्टीज'ने वार्षिक आधारावर २२ टक्के वाढीसह ८,६५१ कोटी रुपयांची बंपर बुकिंग नोंदवत बाजारात अव्वल स्थान पटकावले आहे, तर लोढा ग्रुपनेही ४ टक्के वाढीसह ४,६२९ कोटी रुपयांचे बुकिंग मिळवले आहे. विशेष म्हणजे, एप्रिल आणि मे दरम्यान पश्चिम आशियातील संकटामुळे ॲल्युमिनियम, काँक्रीट, विटा आणि टाईल्स यांसारख्या बांधकाम साहित्याचा खर्च वाढला होता; मात्र कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. सामान्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात आर्थिक वर्षाची चौथी तिमाही (जानेवारी-मार्च) लाँचिंगसाठी मोठी असते, ज्यामुळे त्या तुलनेत पहिली तिमाही नेहमीच थोडी कमकुवत राहते. एकूणच, ही मंदी तात्पुरती असून आगामी काळात ज्या शहरांमध्ये नवीन गृहप्रकल्प लाँच होतील, तिथे घरांची मागणी अत्यंत मजबूत राहण्याची स्पष्ट अपेक्षा वर्तवली जात आहे.