Home Loan : होम लोन झाले स्वस्त. बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँकेची धमाकेदार ऑफर - टॉप न्यूज मराठी

जर तुम्ही सध्या स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गृहकर्जाच्या  आघाडीवरून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट २०२६ मधील ताज्या आकडेवारीनुसार, देशातील काही प्रमुख बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर चक्क ७ टक्क्यांपर्यंत खाली आणले असून, सरकारी बँका यामध्ये सर्वात स्वस्त कर्ज देण्यात आघाडीवर आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका सध्या ग्राहकांना केवळ ७.०० टक्के या सुरुवातीच्या दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय बँक ऑफ इंडिया ७.१० टक्के, तर युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया ७.१५ टक्के व्याजदराने कर्जवाटप करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांचे सुरुवातीचे व्याजदर ७.२५ टक्के आहेत; मात्र कॅनरा बँक ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या कर्जासाठी ७.१५ टक्के अशा सवलतीच्या दराने कर्ज देत आहे.

दुसरीकडे, खाजगी बँकांचे व्याजदर सरकारी बँकांच्या तुलनेत थोडे महाग असल्याचे पाहायला मिळत आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांचा विचार केला तर साऊथ इंडियन बँक सर्वात कमी म्हणजेच ७.२५ टक्क्यांपासून गृहकर्ज देत आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक बँक ७.४८ टक्के आणि आयसीआयसीआय बँक ७.५५ टक्के दराने कर्ज देत आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँक ७.७५ टक्के, ॲक्सिस बँक ८.०० टक्के, तर आरबीएल बँक सर्वाधिक ९.०० टक्के सुरुवातीच्या दराने कर्ज देत आहे. बँकांव्यतिरिक्त हाऊसिंग फायनान्स कंपन्याही या स्पर्धेत उतरल्या असून, एलआयसी हाऊसिंग फायनान्स ७.१५ टक्के आणि बजाज हाऊसिंग फायनान्स ७.२५ टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. आयसीआयसीआय होम फायनान्सचा दर ७.५० टक्के असून, पीएनबी हाऊसिंग फायनान्स ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ७.७५ टक्के व्याज आकारत आहे. ग्राहकांनी कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की, हे सर्व किमान व्याजदर प्रामुख्याने कर्जदाराचा सिबिल स्कोअर ७५०-८०० पेक्षा जास्त असण्यावरच अवलंबून असतात.