HEALTH TIPS: पावसाळा आला की वातावरण आल्हाददायक होते, पण याच सोबत डास, व्हायरस आणि इन्फेक्शनही वाढतात. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप आणि पोटाच्या समस्या लवकर होतात. त्यामुळे या दिवसात मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
1. स्वच्छता सर्वात महत्त्वाची :
बाहेरून आल्यानंतर मुलांचे हात-पाय साबणाने धुवा. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदला आणि कोमट पाण्याने अंघोळ घाला. खेळणी, बाटल्या आणि घरातील पृष्ठभाग रोज निर्जंतुक करा.
2. पाणी आणि अन्नाबत काळजी
फक्त उकळले किंवा फिल्टर केलेले पाणीच पिण्यास द्या. बाहेरील कापलेली फळे, भेळ, पाणीपुरी टाळा. घरात ताजे, गरम आणि हलके अन्न द्या. हिरव्या पालेभाज्या नीट धुऊन शिजवा. विशेष करून पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी अशा भाज्या पावसाळ्यात टाळाव्यात.
3. पावसात भिजणे टाळा
शाळेत किंवा खेळायला जाताना रेनकोट, छत्री आणि अतिरिक्त कपडे बॅगेत ठेवा. ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका, त्यामुळे सर्दी आणि बुरशीचा धोका वाढतो.
4. डासांपासून संरक्षण
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया वाढतात. घरात पाणी साचू देऊ नका. मुलांना फुल स्लीव्ह कपडे घाला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डास प्रतिबंधक क्रीम वापरा. रात्री मच्छरदाणी लावा.
5. रोगप्रतिकार शक्ती वाढवा
आहारात दही, डाळी, फळे, सूप आणि सुके मेवे समाविष्ट करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक असल्यास जीवनसत्व द्या. पुरेशी झोप आणि खेळ यामुळे इम्युनिटी चांगली राहते.
6. आजाराची लक्षणे वेळीच ओळखा :
3 दिवसांपेक्षा जास्त ताप, सतत उलटी, जुलाब, अंगावर पुरळ किंवा सुस्ती दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. स्वतःहून अँटिबायोटिक देऊ नका.
7. घरातील वातावरण कोरडे ठेवा
ओलावा कमी करण्यासाठी डीह्युमिडिफायर किंवा फॅन वापरा. बुरशी येऊ नये म्हणून भिंती आणि कपाटे कोरडी ठेवा. मुलांचे कपडे जमतील तेव्हा उन्हात वाळवा.