सध्या महाराष्ट्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. धरणे भरू लागली आहेत. त्यामुळे लवकरच मोठा विसरह सुरु होऊ शकतो. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशामध्ये विशेषकरून नदी जवळ राहणाऱ्यांना आणि सर्वानीच पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घ्यायला हवी आहे. कारण या काळात साथीचे आजार पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या:
पाणी उकळून प्या: पुराच्या काळात पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता १००% असते. त्यामुळे पाणी नेहमी *किमान १० ते १५ मिनिटे उकळून आणि गाळूनच प्या. शक्य असल्यास त्यात 'मेडिीक्लोर' (क्लोरिनचे थेंब) किंवा विहिरीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करा.
शिळे अन्न खाऊ नका: पुराच्या पाण्यात भिजलेले किंवा दीर्घकाळ उघडे राहिलेले अन्न अजिबात खाऊ नका. नेहमी ताजे आणि गरम अन्न सेवन करा.
भांडी स्वच्छ धुवा : जेवणाची आणि स्वयंपाकाची भांडी स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा. वापरण्यापूर्वी ती गरम पाण्याने किंवा जंतूनाशकाने स्वच्छ करा.
दूषित पाण्याशी संपर्क टाळा: पूर ओसरल्यानंतर साठलेल्या पाण्यात चालणे किंवा खेळणे टाळा. यामुळे लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) सारखे गंभीर आजार होऊ शकतात. जर पाण्यात जावेच लागले, तर गमबूट आणि हातमोजे वापरा.
हात स्वच्छ धुवा : जेवणापूर्वी, जेवण बनवण्यापूर्वी आणि स्वच्छतागृह वापरल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय ठेवा.
कीटकांचा बंदोबस्त: पूर ओसरल्यावर डासांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढतो.
यासाठी:
-घरात व आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
-झोपताना डासदाणीचा (Mosquito net) वापर करा.
-अंगाला डास प्रतिबंधक क्रीम लावा किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा.
ब्लीचिंग पावडरचा वापर : पूर ओसरल्यानंतर घराच्या आजूबाजूला जंतूनाशक किंवा ब्लीचिंग पावडर टाका, जेणेकरून दुर्गंधी कमी होईल आणि जंतूंचा नाश होईल.
ओलावा आणि बुरशी: घरातील भिंती किंवा सामान ओले राहिल्याने बुरशी येऊ शकते, जी श्वसनाच्या आजारांना आमंत्रण देते. घर नीट कोरडे होऊ द्या आणि हवा खेळती ठेवा.
लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या : ताप, जुलाब, उलट्या, अंगावर पुरळ येणे किंवा डोळे येणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार न करता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा.
प्रथमोपचार पेटी (First Aid Kit): घरात ओआरएस (ORS) ची पाकिटे, तापाची व वेदनाशामक औषधे, आणि डेटॉल/अँटीसेप्टिक क्रीम नेहमी तयार ठेवा.
पुराच्या काळात विजेचे खांब, पडलेल्या तारा किंवा ओल्या भिंतींना हात लावणे टाळा.