बऱ्याच लोकांना कायम शरीरात उष्णता जास्त असल्यासारखे वाटते. उन्हाळा असो किंवा थंडी, त्यांना सारखीच गरमी जाणवते. अशा लोकांना डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळ होणे, तोंड येणे, अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा समस्या सतत येतात. इंग्रजी औषधांपेक्षा काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी शरीरातील ही वाढलेली उष्णता लगेच कमी होते.
1.पहिला उपाय म्हणजे मनुका. रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 काळे मनुके कोमट पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर ते मनुके चावून खा आणि ते पाणी पिऊन टाका. सलग 8 दिवस हा उपाय केल्यास पोटातील पित्त आणि शरीराची उष्णता कमी होते.
2. दुसरा सोपा उपाय म्हणजे जिरे. जिऱ्याची तासीर थंड असते. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी गाळून प्या. यामुळे पचन सुधारते आणि शरीराला आतून थंडावा मिळतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
3. तिसरा उपाय आहे सब्जा. सब्जाला तुकमळशी असेही म्हणतात. रात्री एक चमचा सब्जा एका काचेच्या ग्लासमध्ये भिजवा. सकाळी त्यात थोडी खडीसाखर टाकून ते पाणी प्या. हा उपाय शरीरातील उष्णता झपाट्याने कमी करतो.
आहारात बदल करणे खूप महत्वाचे आहे. जेवणात नेहमी थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांचा समावेश करा. काकडी, कलिंगड, टरबूज, आवळा, ब्रोकोली, नारळ पाणी यांचे सेवन वाढवा. दररोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्या. पाण्याची कमतरता झाली की उष्णता लगेच वाढते. वेळेवर जेवणे देखील गरजेचे आहे. अनेकजण जेवणाची वेळ चुकवतात, त्यामुळे पित्त वाढते आणि उष्णता निर्माण होते. दुपारच्या जेवणासोबत काकडी, टोमॅटो, गाजर यांचे सॅलड नक्की खा.
काही पदार्थ टाळले पाहिजेत. काळी मिरी, दालचिनी, लवंग, जास्त तिखट, जंक फूड आणि अतिमसालेदार पदार्थ यामुळे शरीरातील उष्णता वाढते. अशा पदार्थांपासून लांब राहा. या व्यतिरिक्त पुदिन्याची चटणी रोजच्या जेवणात वापरा. कधी बाहेरचे मसालेदार खाल्ले तर लगेच कोकम सरबत प्या. दुपारी एक ग्लास थंड ताक प्यायल्याने देखील शरीर थंड राहते आणि पचनशक्ती वाढते. नारळ पाणी आणि पुदिना पाणी हे दोन नैसर्गिक कोल्ड्रिंक्स आहेत, जे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतील.
टीप : ही माहिती घरगुती उपायांवर आधारित आहे. त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.