वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो आणि लगेच गोळी घ्यावी लागते? पण प्रत्येकवेळी गोळी घेणे शरीरासाठी चांगले नाही. स्वयंपाकघरात असलेल्या काही सोप्या गोष्टींनीही तुम्ही डोकेदुखीपासून लगेच आराम मिळवू शकता. कोणते आहेत ते 9 उपाय पाहूया.
1. आलेयुक्त चहा
आल्याचा चहा फक्त चवीसाठीच नाही तर डोकेदुखीसाठी खूप गुणकारी आहे. आल्यामुळे डोक्यातील रक्तवाहिन्यांची सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. रोज सकाळी एक कप आलेयुक्त चहा प्यायल्यास सामान्य डोकेदुखीचा त्रास खूप कमी होतो.
2. भरपूर पाणी प्या
अनेकदा आपल्या शरीरात पाणी कमी झाल्याने म्हणजे डिहायड्रेशनमुळे डोके दुखते. हे अनेकांना कळतच नाही. त्यामुळे अचानक डोके दुखायला लागले तर आधी 2-3 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने 15 ते 20 मिनिटांतच डोकेदुखी कमी होते.
3. मानेचे स्ट्रेचिंग
तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपवर बसल्याने मान आणि खांद्याचे स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे डोके दुखते. अशावेळी मान हळूहळू डावीकडे-उजवीकडे आणि वर-खाली फिरवा. यामुळे स्नायू मोकळे होतील आणि डोकेदुखीला आराम मिळेल. पण झटका देऊ नका, सावकाश करा.
4. गरम लवंगाचा उपाय
हा आजीच्या बटव्यातला सगळ्यात भारी उपाय आहे. तव्यावर 3-4 लवंगा थोड्या गरम करा आणि लगेच रुमालात बांधा. या गरम रुमालाचा वास घेत राहा. लवंगाच्या उष्णतेमुळे नाक मोकळे होते आणि डोकेदुखी झपाट्याने कमी होते.
5. अॅक्युप्रेशर
आपल्या अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मधल्या भागात दाब दिल्याने डोकेदुखी कमी होते. त्या भागाला एक मिनिटापर्यंत हलक्या हाताने दाबून धरा. हा उपाय अनेकदा तात्काळ आराम देतो.
6. लिंबू पाणी
पोटात अॅसिडिटी वाढली तरी डोके दुखते. अशावेळी एक ग्लास लिंबू पाण्यात थोडे मीठ टाकून प्या. यामुळे शरीरातील अॅसिडचे प्रमाण संतुलित होते आणि डोकेदुखी थांबते.
7. बर्फाचा शेक
डोक्यातील नसांना सूज आल्यानेही डोके दुखते. अशावेळी एका कापडात बर्फ गुंडाळून कपाळावर 5 मिनिटे शेक द्या. यामुळे सूज कमी होऊन थंडावा मिळतो.
8. टरबूज खा
उन्हाळ्यात किंवा पाणी कमी प्यायल्याने होणाऱ्या डोकेदुखीसाठी पाणीदार फळे खूप उपयोगी आहेत. टरबूज, काकडी, संत्री यांसारखी फळे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते.
9. दीर्घ श्वास घ्या
ऑक्सिजन कमी मिळाल्यानेही डोके दुखते. बंद खोलीत असाल तर बाहेर मोकळ्या हवेत जा आणि मोठा श्वास घेऊन हळूहळू सोडा. 5-6 वेळा असे केल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि डोके हलके वाटते.
हे सर्व उपाय घरगुती आहेत. जर डोकेदुखी रोजच होत असेल किंवा खूप तीव्र असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.